वाशीममधील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशीम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष जास्त असून या भागात पावसाचे प्रमाण देखील कमी आहे. शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिके घेण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात वाशीम जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, की सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तर सवंग येथे बलून बॅरेजच्या उभारणीचा सुधारित प्रस्ताव एक महिन्याच्या आत शासनाला सादर करावा. याबाबत शासन एका महिन्यात निर्णय घेईल. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे काम करावे. जे प्रकल्प होऊ शकतात, तेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे.

जिल्ह्यातील छोटे सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला दिलेला ३० कोटी रुपये अतिरिक्त निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जिल्ह्यातील नदी खोलीकरणासह इतर प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा)योजनेंतर्गत वाशीम जिल्ह्यात सहा हजार विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ८७९ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. तसेच ४८३४ विहिरींची कामे प्रगतिपथावर आहे. या विहिरी तातडीने पूर्ण करण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीसोबतच इतर यंत्रणांनाही या कामामध्ये सहभागी करून घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेत सर्व बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित बँक अधिकारी व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. वाशीम येथे कृषि महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने पुढाकार घेण्यात येईल. जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी पशुपालकांना मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com