वृत्तवाहिनीविरोधात हक्कभंग

वृत्तवाहिनीविरोधात हक्कभंग
वृत्तवाहिनीविरोधात हक्कभंग

मुंबई  : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी (ता. १) विधान परिषदेत उमटले. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधिमंडळ कामकाजावर झालेला आरोप अतिशय गंभीर असल्याचे सांगत संबंधितांविरोधात हक्कभंग मांडण्याची सूचना केली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी हे वृत्त प्रसारित करणाऱ्या न्यूज १८ लोकमत या वाहिनीविरोधात, तसेच एचडीआयएल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडला. या ठरावावर विशेषाधिकार समितीने हे अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय द्यावा, असे आदेश सभापतींनी दिले.  ‘‘अशाप्रकारचे कटकारस्थान करून विधिमंडळात आता सत्ताधाऱ्यांनी कमकुवत राजकारण सुरू केले असेल, तर त्याचा शेवट विरोधी पक्षच करेल असे सांगत यापुढे रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची ध्वनिफीत बाहेर काढणार. विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या बातम्या प्रसारित करणारी वाहिनी, तसेच आरोप करणाऱ्या व्यक्तींविरोधात या सभागृहात एकमताने ठराव व्हायला हवा.आपण कोणत्याही अग्निपरीक्षेला तयार आहोत. मंत्र्यांवर पुराव्यानिशी केलेल्या आरोपांचीही खुली चौकशी करावी आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्ती आणि वाहिनीच्या संपादकांसह सगळ्यांचीच नार्को चाचणी व सखोल चौकशी करावी,’’ अशी मागणी मुंडे यांनी केली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंडे यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळत, सरकार काहीही मुद्दाम करत नाही असे स्पष्ट केले. ‘‘विरोधी पक्षनेत्यांविरोधात हे कटकारस्थान असून, यासाठी फक्त संपादक, पत्रकारांनाच जबाबदार न धरता त्या माध्यमाच्या मालकांवरही कारवाई करा. याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे,’’ असे काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनीही धनंजय मुंडे यांच्या मागे असणारा जनाधार खुपत असल्यामुळेच अशाप्रकारे आरोप होत आहेत, असे स्पष्ट केले.  शेकापचे जयंत पाटील म्हणाले, की सत्यतेची पडताळणी न करता अशाप्रकारचे वृत्त दाखवणे म्हणजे सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान आहे. शिवसेनेचे अनिल परब यांनीही अशा प्रकारचे वृत्त सभागृहावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याविरोधात एकमुखी ठराव व्हावा, अशी मागणी केली.  सभागृह नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, की पुराव्याचा आधार नसताना आरोप करू नये. मंत्र्यांना वेगळा न्याय का? या वेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप करत गोंधळ केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. परिचारकांविरोधात ठराव? सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे अनिल परब यांनी प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्यासंदर्भात आक्षेप घेतला. निलंबन मागे घेण्याचा ठराव मागे घ्यावा, तसेच त्यांना बडतर्फ करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी परब यांनी केली. यावर निर्णय देताना सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याबाबत ठराव मांडण्याच्या सूचना परब यांना दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com