गनिमी काव्याने ‘जाम’

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्ग किणी पथकर नाक्‍याजवळ गुरुवारी (ता.१९) दुपारी स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यांनी रोखून धरला
कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्ग किणी पथकर नाक्‍याजवळ गुरुवारी (ता.१९) दुपारी स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यांनी रोखून धरला

पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात जनावरे आणि आपल्या मुलाबाळांसह चक्का जाम केला. आंदोलकांनी पुणे, मुंबईकडे जाणारी दुधाची वाहने अडविली. आंदोलकांविरुद्ध कोणतीही कडक कारवाई न करण्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिस यांच्या समन्वयाने रास्ता रोको मागे घेण्यात आला. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यावर वॉरंट निघाल्याने त्यांनी भूमिगत राहून आंदोलन सुरू ठेवले.  मात्र, असंघटित क्षेत्रातून दुधाचा पुरवठा होत राहिल्यामुळे मुंबईकरांची दूध कोंडी करण्यात स्वाभिमानीला सतत अडचणी आल्या. 

कोल्हापूरकडून पुण्याला येणारे रस्ते रोखून अडविले गेले. पश्चिम महाराष्ट्रात चक्का जामला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी वर्ग कुटुंबासह जनावरे बरोबर घेत महामार्ग तसेच जिल्हामार्गांवर उतरले. स्वाभिमानीच्या आंदोलकांनी टोलनाक्यांच्या भागात गर्दी केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. कोल्हापूरच्या किणी टोलनाक्यावर प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही महिलांचाही ठिय्या दिला. त्यांचे नेतृत्व स्वतः खासदार राजू शेट्टीं यांच्या पत्नी संगीता शेट्टी करीत होत्या. महिलांनी टोलनाका बंद पाडला.   

सांगलीत चक्का जाममुळे कणेगाव फाटा ते येलूर फाटापर्यंत पोलिसांनी वाहतूक रोखून धरली. शेतकरी आंदोलक रस्त्यावर झोपल्यामुळे पोलिसांची तारांबळ झाली. काही भागांत चक्का जामच्या आधीच सकाळी अटक सत्र सुरू केले होते. आरवडे भागात भडकेल्या शेतकऱ्यांनी चितळे डेअरीला जाणारी गाडी फोडून रस्त्यावर दूध ओतून दिले. शिरढोण भागात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. सांगली भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर जनावरे बांधली होती. पंढरपूर भागात स्वाभिमानीने मनसेच्या कार्यकर्त्यांसह रास्ता रोको केला. 

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे व जिल्हाध्यक्ष प्रकाश ढवाण पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बारामती भागातदेखील रास्ता रोको करण्यात आला. पुणे भागात चितळे डेअरीने दूधपुरवठा बंद ठेवल्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये दूध बंदचे फलक लागले होते. पुणे व मुंबईकडे येणाऱ्या दूध पुरवठ्यात लक्षणीय घट झाल्यामुळे या दोन्ही शहरांना पोलिस संरक्षणात दुधाचा पुरवठा केला जात होता. पुणे पोलिसांनी १०० टॅंकरला संरक्षण देत दूध वितरणाला आधार दिल्याचे स्पष्ट केले. 

रविकांत तुपकर भूमिगत पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर भूमिगत राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. अनेक आघाडीचे पदाधिकारी पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते चौध्या दिवशी रस्त्यावर किल्ला लढवित असल्याचे दिसून आले. पुण्याच्या हडपसर भागात दुधाचे टॅंकर फोडल्याबाबत तुपकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. ‘‘मला अटक करण्यासाठी पोलिसांचा ससेमिरा सुरू झाल्यामुळे भूमिगत राहून आंदोलकांना मार्गदर्शन करावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलकांना भेटण्यासाठी मला गमिनी काव्याने जावे लागले. पोलिसांनी कितीही त्रास दिला तरी आम्ही माघार घेणार नाही,’’ असे श्री. तुपकर यांनी स्पष्ट केले. 

विदर्भ, मराठवाड्यात रास्ता रोको बुलडाणा जिल्ह्यात जनावरांसहीत रास्ता रोको करणाऱ्या स्वाभिमानी''च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अमरावतीच्या मोर्शी भागातदेखील रास्ता रोको झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन केले. औरंगाबादच्या गंगापूर भागातील ढोरेगाव येथे स्वाभिमानी संघटनेचे तालुका व प्रहार जनशक्ती पक्षाने संयुक्त आंदोलन करून औरंगाबाद ते पुणे हायवेवर रास्ता रोको केला. 

महाजन-शेट्टी चर्चा निष्पळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानीची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना चर्चेसाठी खासदार राजू शेट्टी यांना भेटले. रात्री अडीच तास चर्चा होऊनदेखील या बैठकीतून काहीही तोडगा निघाला नाही. ‘‘खासदार शेट्टी यांच्या भावना आणि मागण्या आम्ही समजावून घेतल्या आहेत. त्या मी मुख्यमंत्र्यांकडे लगेच पोहचविणार आहे’’, असे श्री. महाजन यांनी सकाळी स्पष्ट केले. मात्र, महाजन यांच्या चर्चेनंतर देखील चक्का जाम होणारच, असा संदेश खा. शेट्टी यांनी पाठविल्यामुळे राज्याच्या अनेक भागांत चक्का जाम झाला.

गावागावांमधील बल्क कुलर बंद पडले- पोपळे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे यांनी सांगितले, की आमच्या आंदोलनानंतरही पहिले दोन दिवस शहरांमध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. कारण, आधीचा साठा उपलब्ध होता. तसेच, संकलनदेखील काही प्रमाणात चालू होते. मात्र, त्यानंतरचे दोन दिवस शेतकरी उत्स्फूर्तपणे दूध टाकण्याचे नाकारू लागले. यामुळे गावागावांमधील बल्क मिल्क कुलर बंद पडले आहेत. त्यात फक्त एक-दोन दिवसांचाच साठा करता येतो. 

"सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतरदेखील महिला व शेतकरी रस्त्यावर उतरले. आम्ही दुधाला दरवाढ घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही, असेही प्रा. पोपळे म्हणाले. आंदोलनातील घडामोडी

  •  राज्यभरात चक्का जामने वाहतूक ठप्प
  •  शेतकरी मुलाबाळांसह जनावरे घेऊन रस्त्यावर
  •  आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय
  •  पुणे, मुंबईकडे जाणारे दूध रोखले
  •  अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड
  •  पोलिसांकडून स्वाभिमानीच्या नेत्यांना अटक
  •  वाॅरंट निघाल्याने रविकांत तूपकर भूमिगत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com