परागीकरण करणारा रोबो ः ब्रॅम्बल बी

व्हर्जिनिया विद्यापीठातील हरितगृहामध्ये ब्लॅकबेरीचे परागीकरण करताना ब्रॅम्बल बी हा रोबो.
व्हर्जिनिया विद्यापीठातील हरितगृहामध्ये ब्लॅकबेरीचे परागीकरण करताना ब्रॅम्बल बी हा रोबो.

आपण जी फळे किंवा भाज्या खातो, त्यांच्या परागीकरणासाठी मधमाश्यांसह विविध कीटक निसर्गामध्ये कार्यरत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये या परागीकरण कीटकांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्याचा फटका कृषी उत्पादनाला बसत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरणासह विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र, पश्चिम व्हर्जिनिया विद्यापीठातील हरितगृहामध्ये ब्लॅकबेरी झुडपाच्या परागीकरणासाठी रोबोंची मदत घेतली जात आहे. खास परागणीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या या रोबोचे नाव ‘ब्रॅम्बल बी’ असे ठेवले आहे. त्याच्या सध्या चाचण्या चालू आहेत. ब्रॅम्बल बीची वैशिष्ट्ये ः

  • हा रोबो एखाद्या स्वयंचलित कारप्रमाणे काम करतो. प्रथम लिडार या तंत्राद्वारे लेसर किरणे सर्वत्र सोडून परिसराचा किंवा हरितगृहाचा त्रिमितीय नकाशा तयार करतो. योग्य मार्गाद्वारे झुडपाच्या जवळ गेल्यानंतर त्यावरील फुलांचे स्कॅनिंग करतो. फुलांचे अत्यंत जवळून फोटो काढतो. फुलांच्या समोर स्थिर झाल्यानंतर त्याच्या आर्मवर असलेल्या कॅमेराद्वारे उच्च प्रतिचे (त्रिमितीय नकाशा) फोटो काढतो. त्यामुळे फूल परागीकरणाच्या स्थितीमध्ये आहे की नाही, याचे ज्ञान होते. फुलातील पुंकेसर, स्त्रीकेसर आणि अन्य घटकांची माहिती मिळते. आर्मच्या टोकाला पॉलीयुरेथीनच्या ब्रिसल्सचा एक ब्रश असून, त्याच्या साह्याने अत्यंत हळूवारपणे परागीकरण करतो.
  • परागीकरण केलेल्या व अपक्व अवस्थेतील न केलेल्या फुलांचीही रोबो नोंद ठेवतो. पुढील फेरीच्या वेळी परागीकरण केलेल्या फुलांना टाळून न केलेल्या फुलांवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे वेग वाढून वेळेमध्ये बचत होते.
  • यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो प्रत्येक कळी, फूल आणि झालेल्या परागीकरणाची नोंद ठेवतो. त्यावरून येणाऱ्या फळांचा दर्जा, आकार आणि एकूण उत्पादन याचा अंदाज मिळू शकत असल्याचे पश्चिम व्हर्जिनिया विद्यापीठातील यंत्रमानव तज्ज्ञ यू गू यांनी सांगितले. त्यांनी या रोबोची संपूर्ण यंत्रणा विकसित केली आहे. त्यांच्या मते यावर अन्य उपकरणे बसवून अयोग्य फुलांचीही काढणीही शक्य आहे.
  • कीटकांना पर्यायच नाही... अर्थात निसर्गातील कीटकांची संख्या आणि कृषी व वन क्षेत्राचा प्रचंड आकार लक्षात घेता परागीकरण करणाऱ्या कीटकांना रोबो कोणत्याही प्रकारे पर्याय ठरू शकत नाही, हे तेथील संशोधकही मान्य करतात.

  • पृथ्वीवर मधमाश्या, जंगली माश्या, भुंगे, फुलपाखरे अशा परागीकरण करणाऱ्या सुमारे २० हजार प्रजाती आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या शरीराची रचना आणि पराग गोळा करण्याची आपली एक पद्धती आहे. त्यानुसार कीटकांचे आकार आणि अनेक फुलांचे आकार, रंग यांचे वैशिष्ट्ये निसर्गामध्ये लक्षावधी वर्षाच्या उत्क्रांतीमध्ये विकसित झाले आहेत. त्यामुळे रोबो तयार करण्यापेक्षा मधमाश्या वाचवण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता मिन्निसोटा विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ मार्ला स्पिवाक यांनी सांगितले.
  • मधमाश्यांच्या वसाहती आणि त्यांच्या प्रवासावर संशोधन करणारे हार्वर्ड विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ जेम्स क्रॅल म्हणाले की मधमाश्यांची घटती संख्या हा जगभरातील जीवशास्त्रज्ञांसमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ यांत्रिकीकरणाच्या साह्याने परागीकरण किंवा उत्पादकता वाढीचे प्रयत्न एकूण निसर्गातील जैवविविधतेसमोर अपुरेच ठरणार आहेत. सध्या विविध आकाराचे रोबो निर्मितीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचा फायदा कृषी उत्पादकतेसाठी काही प्रमाणात झाला तरी एकूण निसर्ग, वनसंपदा आणि त्यांची जैवविविधता जपण्यासाठी कीटकच उपयुक्त ठरतील, यात शंका नाही.
  • लहान कीटकांच्या आकाराचे ड्रोनद्वारे परागीकरण करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, त्यातून नाजूक फुलांची हानीच अधिक होत असल्याचे अनेक वेळा दिसले आहे.
  • अनेक शेतकरी आणि हरितगृह उत्पादकांकडून मधमाशीपालकांकडून कराराने मधपेट्या घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com