नाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा

नाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा
नाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा

नाशिक  : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.

अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून केदार आहेर यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने वसुलीवर भर देण्यात आला आहे. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरीही २५०९ कोटी ३७ लाख ४५ हजार रुपये थकबाकीपैकी ५०३ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षापासून बँक तोट्यात असून, त्यातून बाहेर निघण्यास ती चाचपडत आहे.

२०१७ -१८ मध्ये बँकेला नऊ कोटी तीन लाख २१ हजार रुपये तोटा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील तोटा १२० कोटी ४९ लाख ९४ हजार रुपये इतका होता. म्हणजे, सद्यःस्थिती एकूण तोटा १२९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांच्या घरात आहे. गेल्यावर्षी एनपीएसाठी ६७ कोटी ८९ लाख ७९ रुपयांच्या तरतुदी कराव्या लागल्या असल्यानेच तोटा झाल्याचे कारण अहवालात नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार करण्यात आला नाही. सन २०१६-१९ मध्ये १७२० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.

कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने त्यांनी कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शिवाय बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय बँकेने घेतला. याशिवाय अन्य कारणेही तोट्यामागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे बँकेच्या ठेवींमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर ३३५८.४३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. याच ठेवी मार्च २०१७ अखेर ३१२१ .०६ कोटी रुपये, तर मार्च २०१८ अखेर २६१७.५३ कोटी रुपयांवर आल्या. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या १५२.३२ कोटी रुपयांच्या ठेवी ३.८८ कोटी रुपयांवर आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधी अडकून पडला. त्यानंतर बँकेतून ठेवी काढून घेऊन त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात आल्या. वैयक्तिक ठेवीही २२५६.७८ कोटी रुपयांवरून १७९०.४३ कोटी रुपयांवर आल्या. सहकारी संस्थांच्या ठेवी मात्र १४.३३ कोटी रुपयांनी वाढल्या असून, त्या ८२३ .२२ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्यानेच ठेवींचे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com