ठिबक वितरकांची नोंदणीसाठी धावपळ

ठिबक वितरकांची नोंदणीसाठी धावपळ
ठिबक वितरकांची नोंदणीसाठी धावपळ

जळगाव : अनुदानित ठिबक विक्री करणारे वितरक, विक्रेत्यांना कृषी विभागाकडे नोंदणी बंधनकारक असून, त्यासाठी काही दिवस राहिल्याने वितरकांची नोंदणीसाठी मोठी धावपळ झाली.

नोंदणीसाठीची कार्यवाही पूर्ण करण्याची सुविधा जळगाव शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आहे. एकाच कर्मचाऱ्याकडे हे काम दिले असून, या कामासाठी चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर भागांतील वितरकांना येण्यासाठी दमछाक करावी लागली. जिल्ह्यात सुमारे ३५० वितरक आहेत. पैकी फक्त ५५ वितरकांकडून या नोंदणीसंबंधी वकिलांकडे नोटरी, बंधपत्र, बॅंक गॅरंटी आदी कार्यवाही पूर्ण होऊ शकली. इतरांची नोंदणी मात्र कमी वेळ, किचकट प्रक्रिया, दूरवरचा प्रवास यामुळे होऊ शकली नाही.

काही वितरकांनी रविवारी सुट्टी असतानाही वकिलांशी संपर्क साधून नोटरी व इतर कार्यवाही करून घेतली. त्यासाठी मोठा खर्च आला. लहान वितरकांना धावपळ व खर्च करावा लागला. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने अमळनेर, पारोळा, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, पाचोरा भागातील वितरक अडचणीत आहेत. त्यांना ऐन सणासुदीत आणखी तीन ते चार हजार रुपये खर्च करणे परवडणारे नसल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

ठिबक वितरकांना नोंदणीसाठी मुदतवाढ हवी आहे. या नोंदणीची कार्यवाही सुलभ व लवकर होईल यासाठी काही अटी वगळून ती नोंदणी करण्याची सुविधा तालुका स्तरावर कृषी विभागात करायला हवी. यामुळे अडचण दूर होऊ शकेल. पुढे दिवाळी सण लक्षात घेऊन ही मुदतवाढ दिली जावी, अशी काही वितरकांची अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com