विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांचे निधन

विधानपरिषदेचे माजी सभापती ना. स.फरांदे यांचे निधन
विधानपरिषदेचे माजी सभापती ना. स.फरांदे यांचे निधन

पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. ना. स. फरांदे (वय ७८) यांचे अल्पशा आजारानंतर येथे आज (ता.१६) सकाळी ८वा निधन झाले.  घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला होता. यामुळे त्यांना १५ दिवसांपूर्वी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

मूळचे सातारा जिल्ह्यातील अोझरडे येथील असलेले फरांदे यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. सुरूवातीला त्यांनी धुळे व नंतर नगर जिल्हयातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कोपरगावला प्राध्यापक असताना ते राजकारणात आले. नगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रं सांभाळली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली. त्यांनी नगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात अपयश आले.  निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री

मुंबई : विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, प्रा. फरांदे हे एक ध्येयवादी अध्यापक, चिंतनशील अभ्यासक, अभ्यासू वक्ते आणि चौफेर प्रतिभेचे साहित्यिक होते. सामाजिक बांधिलकीपोटी ते राजकारणात सक्रीय झाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभर फिरून पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. अगदी शेवटच्या स्तरावरील कार्यकर्त्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्राध्यापकांच्या संघटनांसह विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांत सक्रीय योगदान देतानाच प्रा. फरांदे यांनी कृषी, सहकार आणि जलसंधारण क्षेत्रात मोलाचे कार्य केले. विशेषत: कृषी विद्यापीठाचे काम अधिकाधिक शेतकरीभिमुख करण्यासाठी त्यांनी जाणिवेने प्रयत्न केले. विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात प्रारंभी सदस्य, पक्षाचे उपनेते, उपसभापती आणि सभापती पद भूषविताना आपल्या विनयशील कार्यपद्धतीने ते साऱ्यांच्याच आदरास पात्र ठरले होते.

सदैव जागृत ठेवणारे नेतृत्व हरपले : .हरिभाऊ बागडे

 विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा.ना.स. फरांदे यांच्या निधनाने संसदीय सभ्यता आणि शिष्टाचार, विधीमंडळ कार्यसंचालन या क्षेत्रातील एक जाणकार आणि राजकारणातील व्यापक समाजकारणाचा सेवाभाव सदैव जागृत ठेवणारे ज्येष्ठ नेतृत्व यांस आपण मुकलो आहोत. भाजपा पक्ष संघटनेत आम्ही दोहोंनी बरोबरीने काम केलेले असल्याने त्यांच्यातील सर्वांना आपलेसे करणाऱ्या नेतृत्वगुणांचा तसेच शिक्षण, ग्रामविकास, सिंचन, शहरसुधारणा, आरोग्य यासंदर्भातील विधायक कार्याचा मी जवळचा साक्षीदार राहिलो आहे. विधानपरिषदेचे सभापती या नात्याने त्यांनी दिलेले योगदान तसेच पीठासीन अधिकारी परिषदेतील त्यांनी व्यक्त केलेले संसदीय लोकशाहीसंदर्भातील विचार सर्वांना नेहमीच मार्गदर्शक ठरतील. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली, अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com