सातारा जिल्ह्यात प्रतिदिन ७० टन स्ट्रॉबेरीची विक्री

महाबळेश्वर तालुक्यातून प्रतिदिन ५० ते ६० टन स्ट्रॅाबेरी बाजारात जात आहे. शेतकऱ्यांना स्ट्रॅाबेरी प्रतिकिलोस १३० ते १४० असा दर मिळत आहे. - किसनराव भिलारे , अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी विक्री संघ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीचा दुसरा बहर सुरू झाला आहे. सध्या असलेली थंडी स्ट्रॉबेरी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे. एकट्या महाबळेश्वरसह इतर तालुक्‍यांतून प्रतिदिन ६५ ते ७० टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे.  

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍यासह जावळी, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्‍यांत परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. एकूण झालेल्या लागवडीत महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वधिक २५०० ते २६०० एकर, तर अन्य तालुक्‍यांत सुमारे एक हजार ते १२०० एकर, असे एकूण ३५०० ते ३६०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे.

 या लागवडीत नाभिला, कॅमरोझा, विंटर डाऊन आदी वाणाची सर्वाधिक लागवड झाली आहे. स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यात असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे, परिणामी कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.

हंगामाच्या सुरवातीस आलेली स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी जास्त असते. यामुळे या काळात चांगला दर मिळण्यास मदत होत आहे. सध्या स्ट्रॉबेरीस १३० ते १४० रुपये प्रतिकिलो दर सुरू असून, दिवसाकाठी महाबळेश्वर तालुक्यातून ५० ते ६० टन तर इतर तालुक्यातून पाच ते दहा टन स्ट्रॉबेरी मुंबई, पुणेसह बेंगळूर, हैदराबाद, कोलकता, दिल्ली, चेन्नई, रांची आदी मोठ्या शहरांत विक्रीसाठी जात आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुट्ट्या लागून आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी शहरांत आले होते. या पर्यटकांना स्ट्रॉबेरीची थेट विक्री करण्यावर भर दिला जात होता. शेतकऱ्यांकडून आकर्षक बॉक्‍स पॅकिंग करून स्ट्रॉबेरी पाठवली जात आहे. 

प्रीकूलिंग फायदेशीर  या हंगामापासून प्रिकूलिंग यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे स्ट्राॅबेरीचे आयुष्यमान वाढत असल्याने दूरवरच्या शहरात स्ट्राॅबेरी पाठवली जात आहे. यामुळे चांगला दर मिळत असून नुकसान कमी झाले आहे. एकट्या महाबळेश्वर तालुक्यातून प्रतिदिन चार टन स्ट्रॅाबेरी प्रिकुलिंग केली जात आहे.   सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू असून, दर्जेदार स्ट्रॅाबेरी बाजारात जात आहेत. साधारणपणे मार्चअखेर स्ट्रॅाबेरी हंगाम सरू राहण्याची शक्यता आहे, असे श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष  गणपतराव पार्टे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com