अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांची २ फेब्रुवारीपासून सुरवात

संभाजी पाटील निलंगेकर
संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान या नावाने तीन व्याज परतावा योजना व शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची तंत्रकौशल्य योजना येत्या २ फेब्रुवारीपासून राबविण्यात येणार असून, या सर्व योजना ‘महास्वयम’ या संकेतस्थळावरून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित झाली. या वेळी कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुचिता भिकाणे आदी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मागास समाजातील तरुणांसाठी व्याज परताव्याच्या तीन योजना राबविण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रकमेवरील १२ टक्क्यांपर्यंतचा व्याजाचा परतावा महामंडळाकडून देण्यात येणार आहे. कर्जाची मर्यादा १० लाखांपर्यंत आहे. तर दुसऱ्या योजनेत बचत गट, संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी यांना गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये गटाने घेतलेल्या कर्जाचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येणार आहे. तिसऱ्या योजना शेतकरी उत्पादक गटांसाठी असून गट प्रकल्प कर्ज योजनेतून बिनव्याजी दहा लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तंत्रकौशल्य योजना राबविण्यात येणार असून, यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक तंत्र शिक्षण देण्यात येणार आहे. या चारही योजनांची सुरवात येत्या २ फेब्रुवारीपासून होणार असून, या सर्व योजना www.mahaswayam.in या संकेतस्थळामार्फत राबविण्यात येणार असल्याचे श्री. निलंगेकर पाटील यांनी सांगितले. मराठा समाजातील तरुणांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असून, त्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महामंडळास कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com