भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस समाधानकारक राहील.
ताज्या घडामोडी
उमराणे बाजार समितीत कांद्याचे पेमेंट मिळण्यासाठी यापूर्वी २५ दिवसांपर्यंत वेळ लागायचा. आता ते तत्काळ होत असल्याने मोठीच गैरसोय दूर झाली आहे. ही व्यवस्था कायम सुरळीत राहील याकडे आता बाजार समितीने लक्ष द्यावे.
- पंकज दखणे, कांदा उत्पादक, निमोण, ता. चांदवड, जि. नाशिक.
नाशिक : उमराणे बाजार समितीत नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कांदा उत्पादकांना ‘सेम डे’ चा चेक मिळण्यास सुरवात झाली आहे. सकाळ सत्रात कांदा आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच दिवशी बॅंकेमार्फत पैसे मिळत आहेत. दुपारच्या सत्रातही लिलाव झाल्यानंतर ५ वाजेच्या आत बॅंकेतून तात्काळ पैसे मिळत असल्याचा सुखद अनुभव कांदा उत्पादकांना मिळत आहे. नवीन वर्षात कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त दोन दिवसांत पेमेंट मिळवून देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवणारी उमराणे बाजार समिती ही नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. शेतकऱ्यांमधून बाजार समितीच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
नाशिक जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक उलाढाल होणारी उमराणे बाजार समिती मागील महिन्यात व्यापाऱ्यांच्या पैसे अडवून ठेवण्यावरून वादात सापडली होती. काही व्यापाऱ्यांनी दोन महिन्यांच्या पुढील तारखेचे चेक देऊन शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले होते. शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रारी केल्यानंतर बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांना तंबी दिली.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे वसुली करण्यासाठी बाजार समितीकडून धडक कृती करण्यात आली. परराज्यात निघून गेलेल्या व्यापाऱ्यांकडूनही पैसे वसूल करण्यात संचालकांना यश आले. काही व्यापाऱ्यांना मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यास भाग पाडले. या कामी बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कऱ्हे यांचे सहकार्य मिळाले. ‘ॲग्रोवन’मध्ये या बाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.
दरम्यान १ जानेवारी २०१८ पासून ‘सेम डे’ चेक मिळण्याचा महत्त्वपूर्ण बदल शेतकरी अनुभवत आहेत. या विषयी सांगताना बाजार समितीचे सचिव नितीन जाधव म्हणाले की, डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आम्ही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना ‘सेम डे’ चेक देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र व्यापाऱ्यांनी मुदत मागितली होती. त्यानंतर १ तारखेपासून हा उपक्रम सुरू करण्याचे ठरले.
सोमवार १ जानेवारीपासून मागील ४ दिवसांत दररोज सरासरी १५ हजार क्विंटलची आवक बाजार आवारात होत आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून ठरल्याप्रमाणे ‘सेम डे’चा चेक देण्यास सुरवात झाली आहे. या व्यवस्थेवर बाजार समिती बारकाईने लक्ष ठेवून आहे. समितीने ५ कर्मचाऱ्यांचे भरारी पथक नेमले असून या पथकामार्फत व्यवहारांवर लक्ष ठेवले जात आहे.
मागील ४ दिवसांत ‘चेक बाउन्स’ होण्याची एकही घटना घडली नाही. उलट बॅंकेमार्फत ५ वाजेच्या आत चेक भरणा झाल्यास त्याच दिवशी शेतकऱ्यांना पेमेंट होत आहे. जास्तीत जास्त दुसऱ्या दिवसांपर्यंत शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले आहे. या पुढील काळात ही व्यवस्था कायमस्वरुपी सुरू राहणार आहे.
चेक बाउन्स केल्यास व्यापाऱ्यावर कारवाई
उमराणे बाजार समितीने ‘सेम डे’ चेक सुरू करण्याबरोबरच कांदा उत्पादकांना कमीत कमी वेळात पेमेंट मिळेल यासाठी भर दिला आहे. एखाद्या व्यापाऱ्याने चेक बाउन्स केला, तर त्या व्यापाऱ्याचा परवाना एक महिन्यासाठी रद्द करण्यात येईल. दरम्यान त्याचे हिशोब, मागील बाकी, त्याचे रेकॉर्ड याची चौकशी करण्यात येईल. १ महिन्याच्या कालावधीत त्याच्याकडून वसुली करण्यात येईल. त्यानंतर त्याला पुन्हा खरेदीसाठी संधी देण्याबाबत संचालकांच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
प्रतिक्रिया
सर्वाधिक आवकेबरोबरच सुरक्षित व रोख व्यवहारासाठी ही बाजार समिती ओळखली जाते. नव्या वर्षापासून ‘सेम डे’चा चेक देण्याबरोबरच दोन दिवसांत पेमेंट शेतकऱ्याला मिळेल यावर आम्ही भर दिला आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्साह वाढविणारा आहे.
- राजेंद्र देवरे, सभापती- उमराणे बाजार समिती.
- 1 of 142
- ››