‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे आंदोलन

‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे आंदोलन
‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे आंदोलन

नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला नाशिक जिल्ह्यासह राज्यातून होणारा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी आता समृद्धीबाधितांनी थेट नागपूर अधिवेशनावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात समृद्धीबाधित शेतकऱ्यांचे प्रश्न संकलन करण्यासाठी मोहीम राबवण्यात यावी, धरणे आंदोलनप्रसंगी आपापल्या तालुक्यातील आमदारांना भेटीसाठी भूमिका मांडण्यासाठी निमंत्रण दिले जात आहे. १० जिल्ह्यांतील कायदेशीर लढाईची माहिती तिथे देण्यात येणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची कार्यवाही वेगाने सुरू असून नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २४०.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. ७५३ खरेदीखत करण्यात आले आहेत. भूसंपादनात नाशिक जिल्हा पाचव्या स्थानी असल्याचे दिसून येते. या महामार्गासाठी ९ हजार ३३० हेक्टर जमीन संपादित करायची आहे. यातील ८३२६ हेक्टर जमीन शेतकर्‍यांकडून थेट खरेदी-विक्री व्यवहाराने घेण्यात येत असून १००४ हेक्टर जमीन गायरान आणि वनविभागाची आहे. नाशिक जिल्ह्यात ७५३, औरंगाबाद जिल्ह्यात ६८८, बुलडाणा ५४३, वाशीम ५३६, अमरावती ४८८, वर्धा ४८६, ठाणे २०९, जालना १७७, नागपूर १५६ तर नगर जिल्ह्यात केवळ ४६ खरेदीखते करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यातून १०१ किलोमीटरचा मार्ग जात आहे. जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील ४६ गावांमध्ये या मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. या महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील ३२० आणि इगतपुरी तालुक्यातील ४३३ अशा एकूण ७५३ शेतकऱ्यांकडून २४०.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्यातील काही गावांमधून अजूनही या महामार्गाच्या भूसंपादनास प्रखर विरोध दर्शवण्यात येत आहे. आता या विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या अांदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे राजू देसले, बबन हरणे, अ‍ॅड. रतनकुमार इचम, राम बाहेती, तुकाराम भस्मे, विनायक पवार, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, एल. एम. डांगे, शांताराम डुकने, दौलत दुभाषिक, अरुण गायकर, पांडुरंग वारुंगसे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ आदींनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com