मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त टळणार?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाचा नियोजित मुहूर्त लांबण्याची दाट शक्यता आहे. प्रकल्पासाठी अपेक्षित असलेले भूसंपादन पूर्ण करून डिसेंबर २०१७ मध्ये महामार्गाचे भूमिपूजन अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रकल्पासाठी आतापर्यंत फक्त ४८ टक्केच भूसंपादन होऊ शकले आहे. परिणामी, प्रकल्पाचे भूमिपूजन नियोजित वेळेत होण्याची चिन्हे नसल्याचे खात्रीशीररीत्या समजते. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर सुमारे एक ते दीड वर्षात प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १०० टक्के जमिनीचे संपादन करणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पासाठी शहापूर, इगतपुरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. समृद्धी महामार्गासाठी तब्बल ९ हजार ३६४ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ८,५८१ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून थेट खरेदी-विक्री व्यवहाराने घेण्यात येत आहे, तर ८३३ हेक्टर जमीन ही सरकारी गायरान व वन विभागाची आहे. दरम्यान राज्य सरकारचा नियोजित मुहूर्त गाठण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर महिन्यात समृध्दीचे भूमीपूजन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून देण्यात आल्याचे समजते. मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाने हा भूमिपूजनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून दिला आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

समृद्धी मार्गावर ३१ टोल नाके? टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोल नाके प्रस्तावित केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मागितलेल्या माहितीमध्ये ही बाब उघड झाली आहे. आगामी काळात समृद्धी महामार्ग हा प्रकल्प तयार झाल्यानंतर त्यावरून मुंबई ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सुमारे १ हजार ५०० ते २ हजार रुपये इतका टोल मोजावा लागणार आहे. मुंबई ते नागपूर असा ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग प्रस्तावित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com