मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या, चारा...

मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या, चारा...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या, चारा...

सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून जित्रांब दावणीला हायती...पण, जित्राबाला चारा न्हाय...मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या....चारा अशी म्हणण्याची येळ आलीया...पणं कुणी चारा दिना...जनावरं इकायची येळ आल्या...दुष्काळी तालुक्‍यात चाऱ्या इका जित्राबांचे हाल सुरू झाल्याती....पण शासन दरबारी आम्हाला काहीच मदत न्हाय...असं दुःख खराटे (ता. जत) येथे माळरानावर जनावरं चरण्यासाठी आणलेल्या शेतकऱ्यांनी मांडले. खरीप पेरणीपूर्व पावसाचा चांगला अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र सुरवातीला पेरणीवेळी थोडासा पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने पाठच फिरविली. यामध्ये खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या. त्यानंतर पाऊसच झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीच केली नाही. दुष्काळी भागात वैरणीसाठी मका पेरणी केली आहे. मात्र, पाणी नसल्याने मका पीक वाळू लागले आहे. मात्र त्यातून आता वर्षभर पुरेल इतका चारा मिळणार नाही. परिणामी पशुपालकांवर चारा देता का... चारा.... म्हणायची वेळ आली आहे. जिल्ह्यात शेतीबरोबर पशुपालन हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा शेतकऱ्यांचा उद्योग आहे. शेतीचे पैसे वर्षाला येणारे असतात, मात्र जनावरांच्या पैशातून घर चालत असते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठी आहे. जनावरांना जगविण्यासाठी चारा संकट आलेले असल्याचे एव्हाना शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे गोठ्यातील जनावरं आता बाजाराकडे निघाली आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारीदेखील जनावरं पड्या दराने मागत आहेत. सांगली जिल्ह्यातदेखील कोयना आणि चांदोली धरण परिसर वगळता जत, कवठे महाकांळ, तासगाव, खानापूर, आटपाडी आणि मिरजपूर्व भागात पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली. परिणामी चाराटंचाईचे संकट कोसळले आहे. जनावरांना ऐन हिवाळ्यातच चाऱ्याची कमतरता भासू लागलेली आहे. चाऱ्याविना दुष्काळी तालुक्‍यांमध्ये जनावरांचे हाल होण्यास सुरवात झालेली आहे. जिल्ह्यात सुमारे हजार हेक्‍टर उसाची लागवड आहे. सध्या ऊसतोडी सुरू झालेल्या असल्यामुळे उसाचा चारा उपलब्ध होतो आहे. मात्र ती उपलब्धता दुष्काळी तालुक्‍यांमध्ये अतिशय कमी आहे. शिवाय चाऱ्याची उपलब्धता केवळ नदीकाठावरील तालुक्‍यांमध्ये जास्त आहे. वाड्याचा दरही आता ऊसतोडींनी चढ्या दराने केलेला असल्यामुळे ती खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. दुष्काळ जाहीर, पण उपाययोजनांचे काय? जिल्ह्यातील जत, कवठे महाकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्‍यांसह गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाकडून तत्काळ उपायोजना अपेक्षित होत्या, मात्र दुष्काळ जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी होत आला आहे, मात्र अद्याप शासनाकडून ठोस उपायोजना केल्या गेलेल्या नाहीत. पाण्यासाठी टॅंकरची मागणी करूनसुद्धा प्रतीक्षेपलीकडे काहीच झालेले नाही. चाऱ्याचे दर

शाळू कडबा ३५०० रु. शेकडा
कडबा  १५०० रु. शेकडा
ओली मका १००० रु. शेकडा (पेंडीत पाच थाटं)
ऊस वाडे १५०० रु. शेकडा (पेंडीत दहा वाडं)
सांगली जिल्ह्यात जनावरांची संख्या
मोठी जनावरे ६,६७,६३५
लहान जनावरे  १,६६,५४५
शेळ्या मेंढ्या  ४,८२,०२२
सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय जनावरांची संख्या
तालुक्‍याचे नाव  मोठी गाय व म्हैस वर्ग  लहान गाय व म्हैस वर्ग  शेळ्या मेंढ्या
कडेगाव ४५२९५ ११९७९ २३१९१
मिरज ६६०६८ १३५६४ ३५५३२
खानापूर ४७८७० १४७६० २७४१०
तासगाव ७७४९३ २००९२ ३९७३९
वाळवा १०८३२७ २२५१६ ३३६२८
पलूस ४०५७२ ८८७२ १३९८३
शिराळा ५६८३१ १३९३७ ८३२२
जत ११५५४८ ३१७१० १५३८८७
क. महांकाळ क. महांकाळ १६१०८  ५५४०१
आटपाडी ४९०८५ १३००७ ९०९२९
एकूण ६६७६३५ १६६५४५ ४८२०२२

चारा नाय. म्हणून जनावरं माळरानावर हिंडवायला आणल्याती. आत्तापासून जनावरांचे हाल सुरू झाल्यात. पुढं काय होणार असा प्रश्न पडलाय. - शोभा नाईक, पशुपालक, खराटे, ता. जत.

चाराटंचाईमुळे जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने चारा डेपो सुरू करावेत. यामुळे चारा उपलब्ध होईल. - अण्णा मोटे, विभूतवाडी, ता. आटपाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com