आज संत तुकाराम बीज

आज संत तुकाराम बीज
आज संत तुकाराम बीज

देहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा आज (ता.२२) होत आहे. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. 

यंदा ३७१ व्या बीज उत्सव सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात गुरुवारी (ता. २१) पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीला पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठल- रुक्‍मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. बीज सोहळ्यासाठी पंढरपूर, आळंदी या भागातून आलेल्या विक्रेत्यांनी ठिकठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली आहेत. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

चाकण, तळेगाव, देहूफाटा मार्गाने देहूत येणारी वाहतूक इंद्रायणी नदीवरून बंद करण्यात आली आहे. तसेच आळंदी मार्गे येणारी वाहतूक विठ्ठलवाडी येथे थांबविण्यात येणार असून देहूरोडकडून येणारी वाहतूक माळवाडीपर्यंत असेल. विठ्ठलवाडी, माळवाडी येथे बसथांब्यासाठी जागा उपलब्ध केली आहे, असे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी सांगितले. 

इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून स्थानिक जीवरक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत.

आजचे कार्यक्रम 

  • पहाटे ३ ः मुख्य देऊळवाड्यात काकडआरती.
  • पहाटे ४ ः श्री पूजा, शिळा मंदिरात संस्थानचे विश्‍वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते महापूजा. 
  • पहाटे ६ ः वैकुंठ स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा.
  • सकाळी १०.३० ः वैकुंठस्थान मंदिराकडे पालखी प्रस्थान.
  • सकाळी १० ते दुपारी १२ ः वैकुंठस्थान मंदिरासमोर देहूकर महाराजांचे वैकुंठ सोहळा कीर्तन.
  • दुपारी १२.३० ः वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील    मंदिराकडे आगमन. त्यानंतर रात्री पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com