संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे । असा भाव मनी धरून भक्तिचा डांगोरा पिठत, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम''अशा जयघोषात बुधवारी (ता.१८) सकाळी पादुकांचे नीरास्नान उरकून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने जिल्ह्यातील अकलूज शहरात प्रवेश केला. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणावर भव्य असे तिसरे गोल रिंगण रंगले. अश्‍वांची नेत्रदीपक घाोडदौड आणि तुळस वृंदावन डोक्‍यावर घेऊन महिलांनी केलेला धावा, हे दृश्‍य जणू डोळे दीपणारे ठरले.

पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेल्या सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीच्या तीरावर पालखी सोहळ्याचा मंगळवारी मुक्काम झाला. पंढरी समीप आल्याने भल्या पहाटेच जिल्ह्यातील आगमनासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसत होता. पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी नीरा नदीच्या वाळवंटात स्नानासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास पालखीतील पादुका नीरा नदीपात्रात नेण्यात आल्या. पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. सकाळी आठ वाजता सराटीतील भाविकांचा निरोप घेऊन सोहळा अकलूजकडे निघाला. नीरा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर अकलूजच्या गांधी चौकातून ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत स्वीकारत सोहळा पुढे सरकला. भक्तिचा आगळा प्रवाह या रस्त्यावर वाहत होता. ज्ञानोबा-तुकारामच्या भजनाने अवघा आसमंत भारुन गेला होता.

भव्य गोल रिंगणाने डोळे दीपले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भव्य असे गोल रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. त्यासाठी सकाळपासूनच प्रांगणात गर्दी झाली होती. सोहळा पोचल्यानंतर ‘ज्ञानोबा- तुकाराम''चा जयघोष सुरू झाला. झेंडेकरी, टाळकरी, पखवाज वादक, तुळस वृंदावन व कळस घेतलेल्या महिलांच्या स्वतंत्र ओळी लावण्यात आल्या. पखवाज व टाळांनी चांगलाच ताल धरला. सर्व दिंड्या प्रांगणात आल्या. सर्वांच्या नजरा रिंगणावर खिळल्या. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' जयजयकार झाला आणि तुळस वृंदावन व कळस घेतलेल्या महिलांनी रिंगणात धावून प्रदक्षिणा पूर्ण केली. त्या पाठोपाठ विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक धावले. मानाच्या अश्‍वाने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर स्वाराच्या अश्‍वाने दोन प्रदक्षिणा घातल्या. हजारो भाविकांनी डोळे दीपवणारा हा सोहळा साठवून ठेवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com