॥ ते तीर्थांचे माहेर । सर्व सुखांचे भांडार ॥ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

देहू, जि. पुणे : चला पंढरीसी जाऊं । रखमादेवीवरा पाहूं ॥ डोळे निवतील कान । मना तेथे समाधान ॥ संता महंता होतील भेटी । आनंदे नाचो वाळवंटी ॥ ते तीर्थांचे माहेर । सर्व सुखांचे भांडार ॥ जन्म नाही रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥ जगत्‌गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग ओव्यातील ही पंढरीची आस आज शेकडो वर्षांनंतरही कायम असल्याची प्रचिती पुन्हा एकदा येथे आली. सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रूपाने आषाढीवारीकरिता पंढरपूरकडे अडीच वाजण्याच्या सुमारास मार्गस्थ झाला, अन्‌ हातात भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाचा गजर, विठोबा...विठोबा... आणि ज्ञानोबा-तुकाराम नामघोषात देहूनगरी दुमदुमली गेली. पावसाच्या तुरळक सरीमध्ये आणि भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यासमोर फेर धरला. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा परिसरात पालखी प्रस्थान सोहळा प्रसंग ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी देऊळवाड्यात गर्दी केली होती, तर दुसरीकडे इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. उन्ह-पावसाच्या खेळात पालखी प्रस्थानच्या वेळी हलक्या सरी पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पावसाच्या हलक्या सरी अंगावर घेत दिंडीकरी, वारकरी आणि भाविक मुख्य देऊळवाड्याच्या दिशेने पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येत होते.   संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान Video : Aurn Gaikwad

तत्पूर्वी परंपरेनुसार प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले. पहाटे पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे, अशोक नि. मोरे, विठ्ठल मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त सुनील दिं. मोरे, जालिंदर मोरे, अभिजित यांच्या हस्ते पूजा झाली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरातील महापूजा संस्थानाचे विश्वस्त अभिजित मोरे, जालिंदर मोरे, सुनील महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. वैकुंठस्थान मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते झाली.

सकाळी दहा वाजता संभाजी महाराज मोरे यांचे पालखी सोहळ्याचे काल्याचे कीर्तन झाले. । पाहती गवळणी । तवती पालथी दुधानी ॥ या अभंगावर निरुपण केले. सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू (सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या. दिलीप महाराज गोसावी इनामदार यांनी सपत्नीक संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा केली. मानकरी म्हसलेकर यांनी डोक्यावर पादुका घेऊन, संबळ, टाळ-मृदंग आणि तुताऱ्या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्नी गिरिजा यांच्यासमवेत महापूजा केली.

खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार बाळा भेगडे यांच्या हस्तेही महापूजा झाली. पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिर मराठा मंडळ आणि आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक चारमधील ज्येष्ठ वारकरी सदाशिव भोरेकर यांनाही पूजेचा मान मिळाला.

परंपरेनुसार कोथरूड येथील ग्रामपुजारी सुभाष गणेश टंकसाळे यांनी पौराहित्य केले. संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील दा. मोरे, अशोक नि. मोरे, विठ्ठल महाराज मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, सुनील दिं. मोरे, जालिंदर मोरे, पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, प्रांत ज्योती कदम, तहसीलदार गीतांजली शिर्के, एस. सी. सिनलकर व इतर उपस्थित होते. पूजा सुरू झाल्यानंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. मोहिते पाटील व बाभूळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पूजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला.

देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. देऊळवाड्यातील मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली. वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकारामचा नामघोष आणि विठुनामाचा गजर करीत फुगड्या धरू लागले. देहभान विसरून वारकरी आनंदाने नाचत होते. प्रदक्षिणेसाठी मानाच्या दिंड्या सज्ज होत्या. मानाचे अश्व होते. खांद्यावर गरुडटक्के आणि हातात चोप घेतलेले चोपदार होते. देऊळवाड्यातील प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधिस्थळी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची भेट घडविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी पोचला. शुक्रवारी(आज) पालखी सोहऴा आकुर्डीकडे मार्गस्थ होईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com