संत्रा पट्ट्यात थांबले सौदे

संत्रा पट्ट्यात थांबले सौदे
संत्रा पट्ट्यात थांबले सौदे

नागपूर : वातावरणातील बदलामुळे गेल्या दोन वर्षांपासून फळगळीमुळे नुकसान सोसणाऱ्या संत्रा उत्पादकांना गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे पुन्हा कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. व्यपाऱ्यांनी केलेले मृग बहारातील संत्र्यांचे सौदेदेखील फिस्कटल्याने शेतकऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.  विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. यातील एक लाख दहा हजारांवर झाडे मोठी असून, त्यापासून फळे मिळतात. अमरावती, नागपूर जिल्ह्यांत सर्वाधिक तर बुलडाणा, वाशीम, वर्धा या जिल्ह्यांमध्येदेखील कमी अधिक प्रमाणात संत्रा लागवड आहे. एकूण लागवड तसेच फळधारणा होणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ३२ हजार हेक्‍टरवरील क्षेत्राला गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपिटीचा फटका बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काटोल, हेटीकुंडी (कारंजा, वर्धा), चांदूरबाजार, मोर्शी, वरुडचा काही भाग, अंजनगाव, अचलपूर तसेच बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतील संत्रा उत्पादकांचा बाधितांमध्ये समावेश आहे.  व्यापाऱ्यांनी थांबविली खरेदी हवामान खात्याकडून आधीच वादळवारा, गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सौदे झालेल्या बागांतील फळांची तोड थांबविण्यात आली. १० ते १५ टक्‍के ‘ॲडव्हान्स’ रक्‍कम दिली जाते. तोडणीच्या वेळी पूर्ण रक्‍कम देण्यावर व्यापाऱ्यांचा भर राहतो. परंतु ज्या फळांना गारांचा मार लागला आहे, ती फळेदेखील आठवडाभरात गळण्यास सुरवात होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी थांबविली आहे. दहा लाखांचा सौदा झाला असेल त्या शेतकऱ्यांना आता केवळ २ ते ३ लाख रुपये देणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

संत्रा सौदा फिस्कटला झिलपा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील दादासाहेब काळे यांची ५० एकर शेती. ऑटोमायझेशनसह ९ हजार संत्रा झाडे, शेडनेटमधील मिरची लागवड त्यांनी केली आहे. मृग बहारातील संत्र्याला व्यापाऱ्यांनी दहा लाख रुपयांत मागितले होते. परंतु हवामान खात्याने गारपिटीचा अंदाज व्यक्‍त केल्याने व्यापाऱ्यांनी सावध होत तोडच केली नाही. दहा लाख रुपयांत मृगातील संत्र्याचा सौदा ठरला होता. मृग बहारदेखील झडल्याने दुहेरी नुकसान सोसावे लागले आहे. 

नुसते सर्वेक्षण... गेल्या हंगामात वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस तसेच बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे आंबीया बहारातील संत्र्याची फळगळ झाली होती. त्यानंतर प्रशासनाकडून अमरावती जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे यावेळीही सर्वेक्षणाचा केवळ फार्स राहील, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रतिक्रिया... "विदर्भात संत्रा उत्पादकांचे गारपिटीमुळे ३२ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. यापूर्वी संत्रा उत्पादकांचा नुकसान भरपाईच्या अपेक्षेने विमा काढण्यावर भर होता. परंतु विमा हप्ता भरल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीच्या वेळी मात्र अनेक नियम व अटी लादत भरपाई नाकारली गेली. परिणामी आता विमा काढण्यासाठी शेतकरी इच्छुकच होत नाहीत. संत्रा बागांच्या व्यवस्थापनावर लाखो रुपये करणाऱ्यांना विमा हप्ता म्हणून ५ ते १० हजार रुपये भरणे सहज शक्‍य होते. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीपोटी नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी विम्यापासून दुरावत आहेत.'' - श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाऑरेज  ---------- "यापूर्वी झालेल्या फळगळीनंतर नुसते सर्वेक्षण झाले, अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाने यावेळी तरी निदान संत्रा उत्पादकांचे दुःख समजून त्यांच्यासाठी मदत जाहिर करावी. शेतकऱ्यांच्या खात्यांत ही मदत थेट जमा व्हावी, अशी अपेक्षा आहे.'' - अमोल तोटे अध्यक्ष, ऑरेज ग्रोवर्स असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com