सारंगखेडा येथे जागतिक दर्जाचे अश्‍व संग्रहालय साकारणार
सारंगखेडा येथे जागतिक दर्जाचे अश्‍व संग्रहालय साकारणार

सारंगखेडा येथे जागतिक दर्जाचे अश्‍व संग्रहालय साकारणार

नंदुरबार : सारंगखेडा येथे जागतिक दर्जाचे अश्‍वसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. याकरिताचा पाच कोटी रुपये निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या संग्रहालयाचे येत्या ३ ते १० डिसेंबर दरम्यान भूमिजूपन होणार असून, मुख्यमंत्री त्यासंबंधी येण्याची शक्‍यता आहे.  सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा ही अश्‍वबाजारासह शेतीउपयोगी व गृहोपयोगी साहित्य, तांबे, पितळी भांडे यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेला जागतिक स्वरूप मिळावे, यासंबंधी यंदा राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्य पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ३ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान ‘चेतक फेस्टिव्हल’चे आयोजन १८ एकर जागेवर करण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घेऊन हे काम शासन करीत असून, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य जयपालसिंह रावल हे या समितीचे प्रमुख आहे. 

असे असणार संग्रहालय सारंगखेडा येथील अश्‍वबाजारात आता देशातील कानाकोपऱ्यासह विदेशातील सुंदर अश्‍वही येतात. जवळपास साडेतीनशे वर्षे जुना हा अश्‍वबाजार आहे. ही बाब लक्षात घेता पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी सारंगखेडा येथे जागतिक दर्जाचे अश्‍व संग्रहालय उभारले जाणार आहे. त्यासाठी जवळपास २० एकर जागा हवी आहे. त्यात देशविदेशांतील तरबेज, देखण्या, बुटक्‍या, उंच, विविधरंगी अशा अनेक प्रकारच्या घोड्यांचे ब्रीडिंग केले जाईल. तसेच १०० पेक्षा अधिक प्रजातीचे घोडे पर्यटकांना अभ्यासण्यासह पाहण्यासाठी उपलब्ध असतील. देशविदेशांतील घोड्यांची छायाचित्र गॅलरी असेल. घोडसवारीचे प्रशिक्षण, वैद्यकीय उपचार यासंबंधीची यंत्रणा असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक चेतक फेस्टिव्हल १८ एकर जागेत भरणार आहे. महोत्सवात पर्यटकांसाठी निवास, भोजन, पर्यटन, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. सोबतच बैलगाडीवरून सैर, सायकल सफर, घोड सवारी, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. गुजरातमधील रण महोत्सव व राजस्थानमधील पुष्कर महोत्सवाच्या धर्तीवर हा चेतक फेस्टिव्हल होणार आहे. रण महोत्सव आयोजकांची मदत घेतली जात असून, देशविदेशांत चेतक फेस्टिव्हलची माहिती पोचविण्यासाठी यंदा फेसबुकचा आधार घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणेला काम दिले आहे. तसेच काही खासगी विमान सेवा कंपन्यांनाही चेतक फेस्टिव्हलची माहितीपत्रिका देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. त्यात पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आदी उपस्थित होते. रण महोत्सवाचे शिवाजी खासोबनीस आदी उपस्थित होते.  दरम्यान, सारंगखेडा (ता. शहादा) येथे अश्‍वबाजार भरायला सुरवात झाली असून, देशभरातून सुमारे ६०० अश्‍व या बाजारात शुक्रवारपर्यंत (ता. २४) दाखल झाले.  सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताचे सुमारे पावणेचारशे वर्षे जुने मंदिर आहे. हे देशातील एकमेव एकमुखी दत्त मंदिर असून, महानुभव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. १८८५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. दत्त जयंतीपासून यात्रा भरते. अर्थातच ३ डिसेंबर रोजी यात्रेला खऱ्या अर्थाने सुरवात होणार आहे. तत्पूर्वी यात्रेच्या निमित्ताने ३०० वर्षांपासून भरणाऱ्या अश्‍वबाजारात देशविदेशांतून अश्‍व दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली व राज्यातील सुमारे ६०० अश्‍व आले असून, शहादा-दोंडाईचा मुख्य रस्त्यावरील रावल मैदानात हा बाजार भरला आहे; पण अजून अश्‍वांची खरेदी विक्री गतीने सुरू नसल्याची माहिती मिळाली. यात्रेत दरम्यान एकूण १३ ते १४ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. 

शर्यतीमधील अश्‍वांचे प्रदर्शन भरणार  चेतक फेस्टिव्हल समितीकडून शर्यती (रेस कोर्स) व इतर कामांसाठी वापरात येणाऱ्या महागड्या अशा २० अश्‍वांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. त्यासाठी रावल मैदानात स्वतंत्र व्यवस्था केली आहे, तसेच यात्रेनिमित्त जागतिक अश्‍वसंग्रहालयाचे भूमिपूजनही होणार असल्याची माहिती आहे. पाच कोटी रुपये निधी त्यासाठी मंजूर आहे; तसेच शेतीउपयोगी अवजारे, गृहोपयोगी भांडी, साहित्याचा बाजारही भरण्यास सुरवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com