अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकी

अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकी
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकी

पुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण घोटाळा बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच कृषी अधिकारी संतापले, त्यांनी मला कोंडून जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्या, तसेच मला खुनाची धमकी दिली, असा खळबळजनक जबाब कृषी पर्यवेक्षकाने दिला आहे.  कृषी खात्याच्या एका पर्यवेक्षकाने माफीचा साक्षीदार बनून थेट कृषी आयुक्तांसमोर लेखी जबाब दिला आहे. या जबाबात गाव पातळीवर कृषी अधिकारी कशी टक्केवारी खातात व त्यांना पाठिंबा देण्यासाठी कृषी आयुक्तालयातील एक सहसंचालकदेखील कसा पाठिंबा देतो, याची नावासह माहिती जबाबात देण्यात आलेली आहे.  ``पाणलोटाच्या बोगस मापन पुस्तिकेवर मी स्वाक्षऱ्या करीत नसल्याचे पाहून तालुका कृषी अधिकाऱ्याने मला केबिनमध्ये कोंडून स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यानंतर हा पैसा सर्वांनी वाटून घेतला. यात पाणलोट समितीचे अध्यक्ष आणि सचिवाच्या स्वाक्षऱ्या मिळविण्याची कामगिरी कृषी सहायकांनी बजावली आहे,`` असे या जबाबात नमूद करण्यात आलेले आहे. जलयुक्त शिवार अभियान, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम, विशेष घटक योजना अशा सर्व योजनांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून माझ्या परस्पर स्वाक्षऱ्या करून बिले मंजूर केली जात असल्याचा दावा या पर्यवेक्षकाने केला आहे. “केबिनमध्ये कोंडून खुनाच्या धमक्या देत माझ्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी देखील मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना वकिलामार्फत नोटिसा पाठविल्या आहेत. मी स्वतः कोणताही भ्रष्टाचार केलेला नसल्याने मला माफीचा साक्षीदार बनवावे. त्यामुळे चौकशी प्रक्रियेत मला अजून काही गंभीर बाबी उघड करता येतील,’’ अशी मागणी या जबाबात करण्यात आलेली आहे. 

या कामाबाबत खोटा चौकशी अहवाल देण्याचा प्रयत्न होत असून, त्यात एका सहसंचालकाने एका अधिकाऱ्याने पाच लाख रुपये घेतले आहेत. त्यामुळे हा अहवाल न स्वीकारता स्वतः मृद्संचालकांनी चौकशी करून अहवाल द्यावा, अशी मागणी या जबाबात करण्यात आलेली आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांसमोर दिलेला जबाब गंभीर स्वरूपाचा आहे. तथापि, त्यावर लगेच विश्वास ठेवता येणार नाही. यासाठी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असून, त्यात सत्यता दिसत असल्यास प्रशासकीय कारवाई करावी लागणार आहे. सर्वप्रथम या कामांमध्ये झालेली अनियमितता शोधून हडप झालेल्या रकमा वसूल कराव्या लागतील. कामे करताना झालेल्या चुका या अनवधानाने झालेल्या आहेत की हेतुतः झालेल्या आहेत, हे देखील तपासावे लागेल. हेतू गैर असल्यास गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या इतिहासात यापूर्वी गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. मात्र माफीचा साक्षीदार होत कारवाईची मागणी करणारे हे पहिलेच प्रकरण आहे. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप यांनी या प्रकरणात जबाब नोंदवून घेण्याचे धाडस दाखविले आहे. मात्र केवळ जबाबावर न थांबता आयुक्तांनी सोनेरी टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी पाणलोट विभागातील कर्मचारी करीत आहेत. 

गैरव्यवहाराच्या चौकशीत लखपती झालेला अधिकारी कोण “माफीच्या साथीदाराने दिलेल्या जबाबात कृषी विभागातील गैरव्यवहाराची साखळी दिलेली असून, गावपातळीपासून ते आयुक्तालयापर्यंत संगनमत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात दोषींना वाचविण्यासाठी पाच लाख रुपये घेतल्याचा उल्लेख आहे. प्रथमतः हा लखपती अधिकारी कोण, याचा शोध घेण्याची गरज आहे. चौकशीअंती व्यापक प्रमाणात संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्यास गैरव्यवहार करण्याऱ्या साखळीला मोका देखील लावला पाहिजे. मुळात हे प्रकरण आयुक्तालयाला स्वतः हाताळता येत नसल्यास पोलिसांकडे गुन्हा दाखल करून राज्याच्या इतर भागांतील सोनेरी टोळ्यांवर जरब बसवावी,’’असेही मत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com