सातारा-लातूर महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला लवकरच

सातारा-लातूर महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला लवकरच
सातारा-लातूर महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला लवकरच

सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या संमतीविनाच काम सुरू केले आहे. त्यात शेतीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्‍नाकडे आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले. त्यानंतर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांसमवेत बैठक घेण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले.‘ॲग्रोवन'ने गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा विषय सातत्याने मांडल्यांने त्याची दखल विधिमंडळात घेतली गेली.

या महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस, केळीसह अन्य पिके भुईसपाट केली जात आहेत. शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता, हे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. यासंबंधीचे वृत्त ‘ॲग्रोवन'ने ११ आणि १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते.

या विषयावर रुपनवर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पोटे-पाटील म्हणाले, "सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनाच्या दि. ३ जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेद्वारे घोषित झालेला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबतची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. सद्य:स्थितीत राज्यमार्ग क्र. १४१ ची रुंदी २४ मीटर आहे. या आणि प्रत्यक्ष असलेल्या वहिवाटीच्या रुंदीतच दोन पदरी व पेव्हर शोल्डरचे काम प्रगतीत आहे.``

‘‘भौमितिक, वळण सुधारणा, बसवे, विश्रांती थांबा, पथकर नाका आदीसाठी तेथे वहिवाटीच्या रुंदीपेक्षा जास्त रुंदीची आवश्‍यकता आहे. अशा ठिकाणी भूसंपादन करण्यात येणार असून ३ (A) ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रस्ता सुधारणेचे काम करण्यात येणार अाहे``, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कळविले असल्याचेही पोटे-पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com