यंदा सरासरी इतका पाऊस ः स्कायमेटचा अंदाज

प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती कमकुवत होत आहे. समुद्राचे तापमानही गरम होत असल्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता नाही. तसेच निनो इंडेक्स आणि किनाऱ्यालगच्या भागात असलेले इंडियन ओशन डायपोल (आयओडी) यांचाही भारतीय माॅन्सूनवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस पडेल. - जतीन सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायमेट
माॅन्सून
माॅन्सून

पुणे ः यंदाच्या माॅन्सून हंगामात देशात सरासरी इतका म्हणजेच (१०० टक्के) पाऊस पडण्याचे पूर्वानुमान ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने वर्तविले आहे. या पूर्वानुमानात ५ टक्के कमी अधिक तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मॉन्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीनुसार ८८७ मिलिमीटर पाऊस पडतो. भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास दक्षिण द्वीपकल्प राज्य आणि इशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता आहे. या भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडेल. माॅन्सून दाखल होण्याच्या काळात (जून महिन्यात) आणि माॅन्सून परत फिरण्याच्या महिन्यात (सप्टेंबर) देशातील बहुतांशी भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिना कमी पावसाचा ठरणार असला तरी तो सरासरीच्या जवळपास असेल. यंदाच्या माॅन्सूनमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमध्ये चांगला पाऊस अपेक्षित असल्याचे स्कायमेटच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सध्या प्रशांत महासागरात ला-नीना स्थिती निवळत असून, मे अखेरपर्यंत ला-नीना स्थिती सर्वसामान्य होईल. मे ते जुलै या तीन महिन्यात ला-नीना स्थिती सामान्य राहण्याची शक्यता ६० टक्के आहे. तर ला-नीना अस्तित्वात राहण्याची शक्यता २४ टक्के असून, एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता केवळ १४ टक्के आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सध्या नकारात्मक स्थितीत असला तरी धोक्याच्या पातळीच्या आत आहे. हवामान मॉडेल्सनुसार मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात आयओडी सर्वसामान्य स्थितीत येईल. तर मेडन जूलियन अोशिलेशन (एमजेओ) सध्या सक्रीय स्थितीत नाही. मात्र त्याचा माॅन्सूनवर होणाऱ्या परिणामांविषयी आता बोलणे घाईचे ठरेल,असेही नमुद करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेला पुर्वमोसमी हंगाम उष्ण राहणे माॅन्सूसाठी लाभदायक ठरतो. मॉन्सून हवामान शास्त्रज्ञांनी पुर्वमोसमी हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तविली अाहे. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनापुर्वी तापमान अधिक राहणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. यंदा दुष्काळाची शक्यता नाही स्कायमेटच्या पुर्वानुमानानुसार यंदा सरासरीइतका (९६ ते १०४ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजेच ५५ टक्के आहे. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस (१०५ ते ११० टक्के) किंवा सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के पाऊस) पडण्याची शक्यता २० टक्के आहे. तर सरासरीपेक्षा अत्याधिक पाऊस (११० टक्क्यांपेक्षा अधिक) पडण्याची शक्यता केवळ ५ टक्के आहे. तर दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता (९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस) शुन्य टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महिनानिहाय पावसाचे पुर्वानुमान, (पाऊस मिलीमीटरमध्ये)

महिना सरासरी पुर्वानुमान टक्केवारी
जून १६४ १८२ १११
जुलै २८९ २८० ९७
ऑगस्ट २६१ २५० ९६
सप्टेंबर १७३ १७५ १०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com