वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पास १३१३ कोटी

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पास १३१३ कोटी
वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पास १३१३ कोटी

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मौजे धानेप (ता. वेल्हे) येथे कानंदी नदीवर गुंजवणी प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यात येत असून, याद्वारे २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रास बंद नलिकेद्वारे सिंचन लाभ देण्यासाठी या प्रकल्पाला १३१३ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

या प्रकल्पास १६ सप्टेंबर १९९३ मध्ये १९९०-९१ च्या दरसूचीवर आधारित ८६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने प्रकल्पास ३ सप्टेंबर २००२ मध्ये २०००-०१ च्या दरसूचीवर आधारित ३१६ कोटी इतकी प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

बांधकामादरम्यान दरसूचीतील बदल, व्याप्तीतील बदल, भूसंपादनाच्या किमतीतील वाढ, संकल्पचित्रातील बदल व अनुषंगिक खर्चाच्या वाढीमुळे प्रकल्प किमतीत वाढ झाली आहे. यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक होती. द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यताप्राप्त १३१३ कोटी ७३ लाख रुपयांपैकी प्रत्यक्ष कामासाठी ११८४ कोटी ९७ लाख व उर्वरित कामांसाठी १२८ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या प्रकल्पामध्ये मौजे धानेप येथे कानंदी नदीवर ३.६९ अब्ज घन फूट क्षमतेचे धरण बांधून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे वेल्हा तालुक्यातील ८५०, भोर तालुक्यातील ९४३५, तर पुरंदर तालुक्यातील ५७०७ हेक्टर, तर नारायणपूर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील ५४००, अशी २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्राला बंद नलिकेद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या क्षेत्रापैकी पुरंदर तालुक्यातील ११ हजार १०७ हेक्टर क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे. हा प्रकल्प २०१९-२० पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून, प्रकल्पास सुधारित पर्यावरण मान्यता व वन विभागाची मान्यता केंद्र शासनाकडून तसेच केंद्रीय जल आयोगाची मान्यता प्राधान्याने घेण्यात येणार आहे. तसेच बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर हाती घेण्यात आलेल्या गुंजवणी धरण पायथा जलविद्युत प्रकल्पाची पुनर्स्थापना करण्याच्या अटीवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com