फळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड महत्त्वाची ः डॉ. मुंढे

फळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड महत्त्वाची ः डॉ. मुंढे
फळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड महत्त्वाची ः डॉ. मुंढे

औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कल सीताफळ लागवडीकडे वाढला आहे. सीताफळाची लागवड करताना शेतकऱ्यांनी दर्जेदार रोपांची निवड करणे महत्त्वाचे आहे, असे मत अंबाजोगाईच्या सीताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. गोविंद मुंढे यांनी व्यक्‍त केले.

एमजीएम कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सवास गुरुवारी (ता. २०) सुरवात झाली. या महोत्सवात शुक्रवारी (ता. २१) दुसऱ्या दिवशी आयोजित चर्चासत्रात ‘सीताफळ लागवड तंत्रज्ञान’ याविषयी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे कृषिभूषण सुदामअप्पा साळुंके, द्वारकादास पाथ्रीकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एमजीएम हिल्सचे संचालक डॉ. राजेंद्र रेड्डी होते. एमजीएम कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नीलेश मस्के यांनी प्रस्ताविक केले.

डॉ. मुंढे म्हणाले, की सीताफळाची लागवड करताना शेतकऱ्यांनी शिफारशीत वाणांची निवड करावी. धारूर ६, बालानगर वाणाला शेतकरी पसंती देताना दिसतात. सीताफळाची लागवड करण्याची तयारी मेपासून करायला हवी. मेमध्ये खड्‌डा खोदून त्यामध्ये शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व लिंडेन पावडर टाकून खड्‌डा भरून घ्यावा. त्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जून ते सप्टेबरदरम्यान कधीही सीताफळाची लागवड करता येईल. सीताफळात परागीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बागेभोवती फूलवर्गीय पिकांची फूलझाडांची लागवड करावी.योग्य आकाराचे फळ होण्यासाठी झाडावर फळांची संख्या नियंत्रित ठेवावी. फारसे कीडरोग सीताफळावर येत नाहीत. मिलीबगचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण करावे. साध्या पद्धतीने मिलीबगवर नियंत्रण मिळविता येते त्याचा अवलंब करण्याची सूचना त्यांनी केली. उत्पादित मालाला चांगला दर मिळण्यासाठी विक्री करण्यावर भर देण्याची गरजही त्यांनी व्यक्‍त केली.

तांत्रिक सत्रानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला प्रात्याक्षिके, मुरघास प्रात्यक्षिक, मुक्त कुक्कुटपालन, विविध प्रकारचे चारा पिके, पानमळा, रोपवाटिका, मत्सपालन व साखळी शेततळे या प्रात्यक्षिकला भेट दिली. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. २३ सप्टेंबर रोजी मोसंबी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ. एम. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com