शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचवावे ः डॉ. राठोड

शेतकरी मेळावा
शेतकरी मेळावा
 परभणी : हवामान बदलामुळे जगातील सर्वच देशांमधील शेती व्यवसायापुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोचवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डाॅ. नरेंद्र सिंह राठोड यांनी केले.
 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित खरीप पीक शेतकरी मेळावा, तसेच कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन डाॅ. राठोड यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू होते.
 
विस्तार शिक्षण संचालक डाॅ. पी. जी. इंगोले, शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, संशोधन संचालक डाॅ. दत्तप्रसाद वासकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक के. आर. सरफा, कार्यकारी परिषदेचे सदस्य डाॅ. पी. आर. शिवपुजे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डाॅ. पी. आर. देशमुख आदी उपस्थित होते.
 
या वेळी डॉ. राठोड म्हणाले, की शेतकऱ्यांनी विक्रमी पीक उत्पादन घेतल्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. कृषी यांत्रिकीकरणामुळे पीक उत्पादन खर्च कमी करता येणे शक्य आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणावर भर देणे आवश्यक आहे. 
 
डॉ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, की गेल्या वर्षीपासून कडधान्याचे विशेषतः तुरीचे उत्पादन वाढले. परंतु भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कडधान्यांच्या आयात धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी दक्ष राहावे. येत्या एक ते दोन वर्षांत विद्यापीठाने विकसित केलेले दुष्काळात तग धरणारे सोयाबीनचे वाण येणार आहे. नांदेड ४४ कपाशीचे बीटी वाण पुढील वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
 
डॉ. इंगोले यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. या निमित्त आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये विद्यापीठाने विकसित केलेले विविध तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा उत्पादक खासगी कंपन्या सहभागी झाल्या. या वेळी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित केलेल्या खरीप पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ मान्यावरांच्या हस्ते करण्यात आला.
 
राज्य शासनाने पुरस्कार प्राप्त तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. यामध्ये राज्य शासनाचा पुरस्कारप्राप्त सिल्लोड येथील ‘सकाळ’चे बातमीदार (कै.) राजेश चौबे यांच्या वतीने त्यांचे बंधू सचिन चौबे (पानवडोद, जि. औरंगाबाद यांनी सत्कार स्वीकारला.
 
तसेच विद्या रुद्राक्ष (डिघोळअंबा, ता. अंबाजोगाई, व्‍यंकटी गिते (नंदागौळ, ता. परळी), शिवाजी कन्‍हेरे (धानोरा, ता. अहमदपूर), दिलीप कुलकर्णी (नागलगाव, ता. उदगीर), शिवाजी बनकर (जातेगाव, ता. वैजापूर), दत्तात्रय फटांगरे (नांदर, ता. पैठण), बाळासाहेब जिवरख (धोंदलगाव, ता. वैजापूर), मारोती डुकरे, (झळकवाडी, ता. किनवट, जि. नांदेड) यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com