`डाळिंब निर्यातीतील अडथळे एकत्रित प्रयत्नातून सुटतील`

डाळिंब चर्चासत्र
डाळिंब चर्चासत्र
सोलापूर  : डाळिंबाच्या उत्पादनातील शास्त्रीय, तांत्रिक बाबी समजून घेतल्यास निर्यातीतील अडथळे दूर होतील. यात आलेल्या समस्यांमुळेच यंदा युरोपात डाळिंब निर्यात कमी झाली, त्यामुळे अपेडा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि डाळिंब उत्पादक संघ यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच निर्यातीचे प्रश्‍न सुटतील, असे मत अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात नुकतेच निर्यातक्षम डाळिंबातील हाताळणीच्या बाबी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या वेळी श्री. चांदणे बोलत होते. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ.ज्योत्स्ना शर्मा, अपेडाचे सहायक उपसरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक बॅनर्जी, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, डाळिंब संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रगतशील बागायतदार बाबूराव गायकवाड, निर्यातदार अश्‍विन रघुवंशी, प्रकाश बाफना आदी या वेळी उपस्थित होते. 
श्री. चांदणे म्हणाले, डाळिंबातील कीडरोगांच्या समस्यांवर काही उपाय मिळाले आहेत. बाजारात कायम चढ-उतार असतात. द्राक्ष उत्पादकांप्रमाणे डाळिंब उत्पादकांनी सजगपणे काम करण्याची गरज आहे. डाळिंबातील ‘रेसिड्यु फ्रि’च्या विषयावरून सातत्याने चर्चा होते. आता फॉस्फोनिक अॅसिडच्या मालातील आढळाविषयीही काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. द्राक्ष आणि डाळिंबातील त्याच्या एमआरएल या अनुषंगाने समस्येवर उत्तर मिळाले पाहिजे. या प्रश्‍नांबाबत यापूर्वी दिल्लीत अपेडा, संशोधन केंद्र, उत्पादक संघ यांच्या बैठका झाल्या, त्या नियमित व्हाव्यात, अशीही चर्चा झाली, पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यात सातत्य राहिले, तरच प्रश्‍न सुटेल. 
श्री. जाचक म्हणाले, डाळिंब आता महाराष्ट्राचे राहिलेले नाही, ते देशभर होते आहे, त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. त्यात गुणवत्ता, दर्जाला महत्त्व आले आहे. साहिजकच, पैसे मिळतात म्हणून  शेतकरीही एकरी झाडांची संख्या वाढवत आहेत,  परिणामी, रोगराई आणि अन्य प्रश्‍न निर्माण होत आहेत, याला आपणच जबाबदार आहोत. शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने उत्पादन घेतले. तर सगळ्यांचाच फायदा होईल. अनारनेट सुरू झाले आहे, पण त्याचे पुढे काय? याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यायला हवी. 
श्री. बिराजदार म्हणाले, की बागेच्या स्वच्छतेचे महत्त्व आता शेतकऱ्यांना कळाले आहे, त्यामुळे तेलकट डाग, मरसारखे रोग आटोक्‍यात येण्यास सुरवात झाली आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंबाला मागणी आहे. डाळिंबाची बाजारपेठ विस्तारते आहे, आता सेंद्रिय डाळिंबाला मागणी आहे. त्यावर काम होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत डाळिंब केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी केले.
दिवसभराच्या या चर्चासत्रात विविध विषयांवर तांत्रिक सत्रे झाली, त्यात डाळिंबाची हाताळणी यासह डाळिंबामध्ये फॉस्फोनिक अॅसिडचा वापर, डाळिंबाची गुणवत्ता यासह निर्यातक्षम डाळिंबातील रसायनांचा वापर, शाश्‍वत डाळिंब उत्पादन आणि निर्यातक्षम डाळिंब, नवीन वाण, अनारनेटच्या अंमलबजावणीतील बाबी, रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादन आदी विविध विषयांवर डॉ. अशिष मायेती, डॉ. एन. व्ही. सिंग, अश्‍विन रघुवंशी, कौशल कक्‍कर, प्रकाश बाफना, डॉ. कौशिक बॅनर्जी, डॉ. के. डी. बाबू, डॉ. गोविंद हांडे आदींनी शेतकरी, निर्यातदार, शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com