ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

औरंगाबाद : ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, दलित साहित्याचे अभ्यासक, पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी (ता. २७ ) पहाटे दोन वाजेच्या सुमारास निधन झाले, ते ८० वर्षांचे होते.  अस्मितादर्शकार अशी ओळख असलेले डॉ. पानतावणे गेल्या २२ डिसेंबरपासून आजारी होते. त्यांच्यावर औरंगाबादच्या माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती उपचाराला दाद देत नसल्याने त्यांना सोमवारी (ता. २६) औरंगाबादमधीलच एमआयटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना भारत सरकारतर्फे नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.  डॉ. पानतावणे यांचे पार्थिव नागसेनवन परिसरातील मिलिंद महाविद्यालयासमोरील  त्यांच्या श्रावस्ती या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नातेवाईक, मित्र परिवार, साहि.ित्यक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी येथे दर्शन घेतले. पद्मश्री डॉ. पानतावणे यांचा साहित्य परिचय ग्रंथनिर्मिती : मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, मूकनायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे प्रबोधन, वादळांचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, दलित वैचारिक वाङ्‌मय, लेणी, साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य : शोध व संवाद, स्मृतिशेष, अर्थ आणि अन्वयार्थ, आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, बुद्धचिंतन, विद्रोह, विज्ञान आणि विश्‍वात्मकता, साहित्यनिर्मिती : चर्चा आणि चिकित्सा, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड. संपादित ग्रंथ : दलित आत्मकथन, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकचळवळीचे प्रणेते : महात्मा जाेतिबा फुले, लोकरंग, स्त्री आत्मकथन, धम्मचर्चा, दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन ग्रंथ, भ्रांत निभ्रांत, महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे काढण्यात आलेला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोष. ज्येष्ठ स्नेही हरपल्याचे दुःख प्रख्यात विचारवंत, दलित साहित्याचे गाढे अभ्यासक, "अस्मितादर्श' नियतकालिकाचे विद्वान संपादक, थोर लेखक आणि समीक्षक, तसेच पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावून गेली. ज्यांच्याकडे आदराने पहावे, असे ज्येष्ठ स्नेही हरपल्याचे दुःख झाले. पानतावणे सरांच्या कार्यकर्तृत्वाला कृतज्ञतापूर्वक वंदन. - डॉ. नरेंद्र जाधव, अर्थतज्ज्ञ, लेखक, राज्यसभा सदस्य. व्यासंगी समीक्षक हरपला ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, प्रा. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्रातील एक प्रगल्भ लेखक व व्यासंगी समीक्षक हरपला. मराठी सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील कृतिशील विचारवंत म्हणून "अस्मितादर्श'कार प्रा. गंगाधर पानतावणे सरांचे नाव कायम अग्रणी राहील. पानतावणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! - शरद पवार, खासदार आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष. लेखणीला कृतिशीलतेची जोड डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनामुळे आपण लेखणीला कृतिशीलतेची जोड दिलेल्या विचारवंतास मुकलो आहोत. त्यांनी अनेकविध लेखनप्रकार हाताळले; मात्र त्याचा गाभा तेजस्वी आंबेडकरी विचार हाच होता. - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. व्यासंगी प्राध्यापक, कृतिशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. पानतावणे यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान अस्मितादर्शक म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com