बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला जोड म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले अाहेत. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात रेशीम शेती भरारी घेत अाहे. जिल्ह्यात सप्टेंबरअखेर ३३ टन रेशीम कोष उत्पादन झाले असून शेतकऱ्यांना या माध्यमातून किमान ९९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे.

जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी केली. सीमांत व अल्पभूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील, दारिद्रय रेषेखालील, वन्य निवासी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, महिला प्रधान कुटुंब आदींसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी तीन वर्षांकरिता कीटक संगोपन गृह बांधकामासह दोन लाख ९२ हजारांचे अनुदान दिले जाते. २०१८-१९ मध्ये सप्टेंबरअखेर या याेजनेअंतर्गत एक कोटी चार लाख ४२ हजार रुपये कामांच्या प्रगतीनुसार कुशल व अकुशल अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यामधून २१ हजार ६७ मनुष्यबळ दिवसांची मजुरी अदा करण्यात आली आहे.

गावात किमान १० लाभार्थ्यांची निवड केली जात असल्याने रेशीम शेतकरी गटांना तांत्रिक कामे करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऐक्याची भावनासुद्धा निर्माण होत आहे. एकाच वेळी अंडीपुंज घेऊन रेशीम कीटक संगोपन करण्यात येत आहे. रेशीम कोष उत्पादित झाल्यावर वाहतूक खर्च कमी करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने रामनगर (बंगळूर), जालना, हैदराबाद येथे रेशीम कोषांची विक्री केली जात आहेत. सप्टेंबरअखेर ३३ टन कोष उत्पादन झाले असून अंदाजे ९९ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना कोषांपासून मिळाले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी अाहेत त्यांच्यासाठीसुद्धा २०१८-१९ मध्ये ‘सिल्क समग्र' ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी कार्यालयाकडे १३५ शेतकऱ्यांनी संपर्क केला आहे. त्यासाठी ३२४.५० एकर जमीन करण्याची मर्यादा आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेतून तुती लागवड, सिंचन सुविधेसाठी अनुदान, रेशीम कीटक, संगोपन गृह बांधकाम व रेशीम कीटक संगोपन सहित्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. सध्या तुती लागवडीसाठी प्रस्ताव स्वीकारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. मोठे शेतकरीसुद्धा तुती लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com