द्राक्षांची निर्यात वाढण्यासाठी मोठा वाव : शरद पवार

शरद पवार
शरद पवार

बालेवाडी, जि. पुणे  : एकेकाळचा आयातदार देश ही ओळख भारतीय शेतकऱ्यांनी पुसून टाकली आहे. शेतीमाल विशेषत: विविध फळांच्या निर्यातीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. इतर फळांच्या तुलनेत द्राक्षे, डाळिंब या फळांच्या निर्यातीत देशाचं स्थान अत्यल्प आहे. द्राक्षांची निर्यात ७ टक्के इतकीच आहे. ती वाढण्यासाठी मोठा वाव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय फळांचे स्थान वाढवावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५८ वे वार्षिक अधिवेशन बालेवाडी (जि. पुणे) येथे गुरुवार (ता.२३) ते शनिवार (ता.२५) या दरम्यान होत आहे. शरद पवार यांच्याहस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सोपान कांचन, माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, महेंद्र शाहीर, फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. शिखामणी, डॉ. प्रकाश, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस .डी. सावंत, द्राक्षतज्ज्ञ कोबस बोथमा, डॉ. बॅटानी उपस्थित होते.

शरद पवार यांनी भाषणात द्राक्ष शेतीपुढील आव्हानांचा आढावा घेत जागतिक बाजारात भारतीय द्राक्षांचे स्थान मजबूत करण्याचे आवाहन केले. श्री. पवार म्हणाले, की मी सातत्याने देशाच्या विविध भागांतील द्राक्ष उत्पादकांशी चर्चा करतो. त्यांची मते जाणून घेतो. वर्षातून एकदा आपण सगळे एकत्रित चर्चा करतो. संघटनेच्या माध्यमातून पुढील प्रयोगांची दिशा ठरवली जाते. त्याचा परिणामी असा झालाय की सुरवातीला महाराष्ट्रातील ठरावीक जिल्ह्यांपुरती मर्यादित असलेली द्राक्षशेती इतर अनेक जिल्ह्यांत वाढली आहे. जालना, बुलडाणासारख्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर लागवड झालीय. यातून जाणकार शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे ही जमेची बाजू आहे. जागतिक फलोत्पादनात भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. त्यात ज्या राज्यांचे योगदान आहे. त्यात महाराष्ट्र हा सर्वांत पुढे आहे. द्राक्षांसह आंबा, काजू, केळी, चिकू, संत्री, मोसंबी या फळपिकांनी मोठे काम केले आहे. याचे श्रेय अर्थातच राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनाच जाते.

फलोत्पादनापुढे अनंत आव्हाने आहेत. शेतकरी हिंमतीने त्यावर मात करीत आहेत. त्यांना राज्य व केंद्र सरकारने १०० टक्के मदत करावी अशी त्यांचीही अपेक्षा नाहीय. मात्र तरीही अडचणीच्या काळात सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही अपेक्षा अत्यंत रास्त स्वरूपाची आहे.

मागील काही वर्षांची आपली फलोत्पादनातील वाटचाल अत्यंत प्रगतिशील राहिली आहे. मला आठवतं १९७२ च्या वर्षी देशातील मी अन्नखात्याचा मंत्री होतो. त्या वेळी मी जिथे जाईल तिथे संघर्षाचा सामना करावा लागत होता. टंचाई आणि दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत होता. अन्नधान्यासाठी परदेशावर अवलंबून राहावे लागत होते. मुंबईच्या गोदीतून धान्य आणायचे व ते रेशनमधून नागरिकांना पुरवायचे हे माझे प्रमुख काम बनले होते. दरम्यान, मागील चार दशकांच्या वाटचालीत आपण जगातील प्रमुख शेतमाल निर्यातदार बनलो आहोत, असेही श्री. पवार म्हणाले.

देश नुकताच ज्यांच्या निधनाने हळहळला आहे. ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना २००० मध्ये आम्ही त्यांना भेटलो. कापूस शेतीच्या अनुषंघाने बीटी कॉटन भारतात आले पाहिजे यासाठी आग्रह धरला. हा तेव्हा वादग्रस्त विषय होता. अनेकजण त्याला विरोध करीत होते. मात्र वाजपेयी यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. परिणामी, देश नंतरच्या काळात कापसाच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण झाला. याचं श्रेय बीटी कॉटनलाच जाते. हे नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सतत पोचत राहिले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.

जागतिक वाणांसाठी ठोस प्रयत्न आवश्‍यक जागतिक दर्जाचे नवे वाण ही द्राक्ष शेतीची गरज आहे. असे वाण जगभरात उपलब्ध आहेत. त्यावर झालेले संशोधन पाहता पेटंट स्वरूपाचे वाण मिळविण्यासाठी खर्चही मोठा आहे. त्यासाठी अधिकचा पैसा द्यायची तयारी ठेवावी लागणार आहे. त्या शिवाय पर्यायही नाहीय. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी मी स्वत: ऑक्‍टोबरमध्ये स्पेन, जर्मनी, इटली, फ्रान्स येथील संशोधन केंद्रांना तसेच वाणनिर्मिती करणाऱ्या तज्ज्ञांना भेटून त्याबाबत प्रयत्न करणार आहे. प्रयोगशीलता सातत्याने टिकवून ठेवून मजबूत संघटनातून शेतीपुढील प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच जगातील तंत्रज्ञान मिळविण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

निर्यात वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत

द्राक्षांची निर्यात २ लाख टनांपर्यंत पोचली आहे. द्राक्षांचे क्षेत्रही वाढत आहे. तशी द्राक्षशेतीतील समस्यासुद्धा वाढत आहेत. या समस्या दोन प्रकारच्या आहेत. पहिली पिकाच्या संदर्भात तर दुसरी मार्केटच्या संदर्भातील आहे. त्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन ती सोडविण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. मार्केटचे प्रश्‍नही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन प्रकारचे आहेत. स्थानिक बाजार हे ही प्रचंड मोठं आहे. त्यातही दिल्लीचं मार्केट हे अधिक मोठं आहे. मला दिल्लीत अनेक फळ उत्पादक भेटतात. ते सांगतात की दिल्लीतील व्यापाऱ्याने फसविले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात जी जी शहरे बदनाम आहेत. त्यात सर्वांत वरचा उल्लेख देशाच्या राजधानीचा येतो. याबाबतीत आपण प्रत्येकानं थोडं सावध राहिलं पाहिजे.

देशांतर्गत व निर्यातीच्या बाजारातही फसवणूक होणार नाही या दृष्टीने कठोर नियोजन करणे आवश्‍यक आहे. द्राक्षांच्या बाबतीत जागतिक बाजारात आपलं स्थान अजूनही बरंचसं मागं आहे. व्हिएतनाम, थायलंड यासारख्या देशांतही आपल्याकडील वाणांना चांगली मागणी आहे. यासाठी अपेडा आणि वाणिज्य मंत्रालयाच्या स्तरावरून होणारे निर्णय हे महत्त्वपूर्ण ठरतील. राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि वाणिज्य मंत्रालय यांच्यात त्या संदर्भात बैठक होणे गरजेचे आहेत. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्रातील असून, त्यांच्या समोर द्राक्ष निर्यातीच्या समस्या योग्य पद्धतीने मांडल्यास ते त्यावर नक्कीच सकारात्मक भूमिका घेतील. त्यासाठी काम होणे गरजेचे आहे.

शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात घरोबा हवा देशातील सर्वांत महत्त्वाचा घटक शेतकरी हा आहे. तर दुसरा तितकाच महत्त्वाचा घटक शास्त्रज्ञ आहेत. आज पुढे जाण्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात चांगला घरोबा होणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांचं दुखणं त्यांना कळलं पाहिजे. शास्त्रज्ञ काय संशोधन करताहेत हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. त्यासाठी संशोधन केंद्राने शास्त्रज्ञ आणि जाणकार शेतकरी यांची वर्षातून एकदा नियमित बैठक घेतली पाहिजे.

संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी प्रास्ताविक केले. आर्वे यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. द्राक्षशेतीच्या समस्यांबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सोपान कांचन म्हणाले, की राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माध्यमातून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला निधी मिळण्यात दुजाभाव होत आहे. बेदाणा क्षेत्राच्या विकासासाठी रेझिन बोर्ड स्थापन करावे. भारताने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घ्यावा. त्यातून भारतीय द्राक्षांचे ब्रँडिंग होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी कैलास भोसले यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com