अतिपावसाचा खरिपाला फटका

विसरवाडी, जि. नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १७) जोरदार पाऊस झाला. यामुळे रंगावली नदीला पूर आल्याने नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले. शनिवारीही (ता. १८) नदी ओसंडून वाहत होती.
विसरवाडी, जि. नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १७) जोरदार पाऊस झाला. यामुळे रंगावली नदीला पूर आल्याने नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले. शनिवारीही (ता. १८) नदी ओसंडून वाहत होती.

पुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार (ता. १७) पर्यंत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दणका दिला. यात नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रंगावली नदीने रौद्ररूप धारण केल्याने जीवित आणि वित्तहानी झाली. तर विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीमसह यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर मराठवाड्यात पाण्याअभावी खरीप धोक्यात आला असतानाच जोरदार पावसामुळे पिकांचे अातोनात नुकसान झाले आहे. आज (ता. १९) कोकण, विदर्भात पाऊस वाढणार असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने विर्तविली आहे. 

 नवापूर, (जि. नंदुरबार) तालुक्‍यात शुक्रवारी (ता. १७) पहाटे झालेल्या अतिवृष्टीने तीन महिला व दोन पुरुषांचा बळी घेतला; तर ५७ जनावरेही या पावसात मृत्युमुखी पडली. तसेच नवापूर, विसरवाडी, बोकळझर, चौकी या भागांतील ४१९ घरांचे नुकसान झाले. रंगावली नदीला पूर अाल्यानंतर पहाटेची वेळ असल्याने रौद्ररूप लवकर लक्षात न आल्याने जीवित व वित्तहानी वाढली. भागातील रहिवासी सईदा हुसेन काखर (भगतवाडी, नवापूर), जामनाबाई लाशा गावित (बालहाट, ता. नवापूर) या दोघी पुरात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडल्या. शेवंतीबाई बोदल्या गावित (खोकसा) यांच्या अंगावर घर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाघळापाडा (ता. नवापूर) येथील काशिराम बाबजी गावित हे नागझरी धरणाच्या सांडव्यावरून जात असताना पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेले. अन्य एका पुरुषाचाही मृतदेह सापडला असून, त्याची ओळख अद्याप पटली नाही. तसेच, पुरामुळे अनेक वाहनांचेही नुकसान झाले. सुरत-नागपूर महामार्गावरील शहरातील पूल, करंजी ओवाराचा (नई होंडा) उंच पुलावरून पाणी वाहत असल्याने नवापूर शहराकडे येणारे सर्व मार्ग बंद झाले होते.

वऱ्हाडात नुकसान वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात गुरुवारी (ता.१६) झालेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहिले. पुराच्या पाण्यामुळे काठावरील शेतातील पिकांचे नुकसान झाले. मोर्णा, काटेपूर्णा, पूर्णा, कमळगंगा, उमा या नद्यांना पूर आला आहे. अकोला जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक असून, यंत्रणाकडून आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ५० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. तर, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. हातरुण भागात मोर्णा नदी, कोळसा नाल्यांना पूर आल्याने नदीकाठावरील १२५ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा तालुक्यात पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला.

यवतमाळमध्ये मोठी हानी यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक तालुक्‍यांत झालेल्या अतिवृष्टीने २२ हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला असून, तब्बल चार हजार घरांची पडझड झाली. महसूल विभागाने या नुकसानीच्या पंचनामाचे आदेश दिले अाहेत. दिग्रस, आर्णी, उमरखेड, महागाव, दारव्हा या पाच तालुक्‍यांत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. धुवाधार पावसाने नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी दिग्रस, आर्णी शहरात घुसल्याने नुकसान वाढले.

भातशेतीला फटका जुन्नर (जि. पुणे) तालुक्याच्या ऐतिहासिक दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली येथे गुरुवारी (ता. १६) झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या भात खाचरात ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह घुसल्याने भातरोपे व माती वाहून गेली आहे. सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मीना नदीला पूर आला आल्याने नदी काठावरील असणाऱ्या शेत जमिनीत पुराचे पाणी घुसल्याने पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी जोर ओसरलेल्या पावसाने शनिवारीही राज्यात उघडीप दिली होती. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली.  शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग)     कोकण : बिरवडी ४२, करंजवडी ४०, खारवली ४०, इंदापूर ५१, गोरेगाव ४८, लोनेरे ५०, निझामपूर ५२, खामगाव ४५, तला ४७, धामनंद ४३, अबलोली ४७, देव्हरे ४२, सवंडल ४४, कोंडीया ४०, भांबेड ४६, विलवडे ४२, देवगड ४२, मीतबंब ४२, शिरगाव ६४, पाटगाव ४९, बापर्डे ४२, श्रावण ५३, अंबोली १०५, कनकवली ६४, फोंडा ५६, सांगवे ७४, नांदगाव ११४, तालेरे ४०, वागडे ५८, कडवल ६५, कसाल ५०, वैभववाडी ४६, येडगाव ४२.   मध्य महाराष्ट्र : पेठ ४०, जागमोडी ४६, वेळुंजे ५०, शेंडी ४२, मुठे ५७, काले ४८, लोणावळा ४६, वेल्हा ४१, बामणोली ४३, हेळवाक ६९, महाबळेश्‍वर ८२, तापोळा ११८, लामज १३७, करंजफेन ६७, आंबा ८६, राधानगरी १०३, आवळी ४१, कसबा ४६, गगनबावडा ५०, साळवण ५७, कराडवाडी ४५, आजरा ४१, गवसे ६०, चंदगड ५५.    मराठवाडा : मालेगाव २८, डोंगरकडा २७.   विदर्भ : वाळगाव ५६, शिरळा ४५, नांदगाव ४०, निंभा ४८, चांदूर रेल्वे ४३, साटेफळा ५१, रिद्धापूर ५५, अंबडा ४२, बेलोरा ५२, करजगाव ७२, असेगाव ४४, तळेगाव ४८, शिरजगाव ९७, ब्राह्मणवाडा ९५, दत्तपूर ४०, गिरड ५५, खापा ६६, बडेगाव ४६, असारळी ५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com