`डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी  फेटाळून लावा, घटना दुरुस्त्या रद्द करा` 

शेतकरी संघटनेचे आधिवेशन
शेतकरी संघटनेचे आधिवेशन

शिर्डी, जि. नगर ः डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी फेटाळून लावा या मागणीसह शेतीतून बाहेर पडणे, शेतीचा विस्तार करणे, नव्याने शेती करणे या प्रक्रियेआड येणारे कायद्याचे  अडथळे दूर करणे आदी मागण्या करणारे ठराव, शेतकरी संघटनेच्या चौदाव्या खुल्या संयुक्त अधिवेशनात मंजूर करण्यात आले. 

शिर्डी येथे शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे तीन दिवसीय चौदावे संयुक्त अधिवेशन पार पडले. बुधवारी (ता.१२) खुले अधिवेशन झाले. त्यात विविध ठराव मांडले गेले.  यात  निर्बंधमुक्त ऊस, डॉ. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आणि शिफारशी रद्द करणे, महिला, तरुणांचे प्रश्न, ग्रामीण पुनर्रचनेची अपरिहार्यता आदी बाबींचा समावेश होता.  प्रचलित वीजपुरवठा असून अडचण नसून खोळंबा आहे. त्यामुळे शेतकरी वीज भरण्यास बांधील नाही, असे मुद्देही मांडले.

‘दर्शन आंदोलन, दुर्लक्ष आंदोलन’ आतापर्यंत निवडणुका जात, धर्मांच्या नावावर होत आल्या. आता निवडणुका कृषी धोरणांवर झाल्या पाहिजेत. त्यासाठी  प्रत्येक गावांत कृषी धोरणांवर नेते बोलले नाही तर उठून जा. असे ‘दुर्लक्ष आंदोलन’ करायचे आहे. भविष्यात निर्यातबंदी केली केली तर रस्त्यावर येऊन ‘दर्शन आंदोलन’ करणार आहोत.  जो पक्ष कर्जमुक्ती करेल, समाजवाद सोडून स्वातंत्र्यवाद स्विकारेल त्यांच्या सोबत रहायचे आहे, असा निर्णय अधिवेशनात जाहीर करण्यात आला. 

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या चौदाव्या संयुक्त अधिवेशनाचा बुधवारी खुल्या अधिवेशनाने समारोप झाला. पंजाबचे शेतकरी नेते, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान,  माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट,  मानवेंद्र काचोळे, गुणवंत पाटील हंगरगेकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, गोविंद जोशी, दिनेश शर्मा, देविदास पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापुराव आढाव आदी या वेळी उपस्थित होते.

अधिवेशनात करण्यात आलेले ठराव

  • अत्यावश्यक कायदा रद्द करावा. बाजार समितीचा जुलमी कायदा रद्द करावा.  
  • शेती हा घटक धरून संपूर्ण शेती कर्जमुक्ती करावी  कर्ज मिळण्यासाठीची प्रक्रिया सोपी करावी. कर्जप्रकरणे तपासणीसाठी समिती स्थापन करावी.  
  • सरकार शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करत राहील आणि शेतमालाचे  भाव पाडत राहतील तोपर्यंत शेतकऱ्यांना भरपाई म्हणून प्रती एकर पंधरा हजार रुपये भरपाई मिळावी.   
  • हे अधिवेशन सर्वोच्च  न्यायालयाला विनंती करते की, त्यांनी स्वतः होऊन पुढाकार घेऊन संविधानाची पुनर्तपासणी करावी आणि देशातील  नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणाऱ्या व त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या सगळ्या घटना दुरुस्त्या रद्द  कराव्यात. 
  • शेती उत्पादनाच्या बाजारात हस्तक्षेप करण्यास आणि शेती उत्पादनाच्या प्रक्रिया उद्योगांवर निर्बंध लादण्यास सरकारला  कायदेशीर अधिकार प्रदान करणारा अत्यावश्यक वस्तू कायदा या घटनेच्या ९ व्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्यासह शेती विकास आणि स्वातंत्र्याच्या विरोधात असलेले, जमीनधारणा कायदा, कुळ कायदा, जमीन हस्तांतरण  कायदा यासारखे शेतजमिनी वापराला निर्बंध घालणारे सर्व कायदे संपुष्टात आणावेत.  
  • शेतीच्या खरेदी अाणि  विकासासाठी किमान बीज भांडवलाच्या शर्तीवर उद्योग क्षेत्राच्या धर्तीवर दीर्घ मुदतीचा अाणि आवश्यकतेप्रमाणे पतपुरवठा  करण्यासाठी सरकारने स्वतंत्रपणे शेती व्यवसाय पुनर्रचना निधी स्थापित करावा.   
  • कारखान्यांनी साखरेच्या विक्रीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना ऊसाचे भाव म्हणून दिली पाहिजे .  
  • साखर व्यवसाय कायमस्वरुपी निर्बंधमुक्त केला पाहिजे.  
  • मागणी आणि पुरवठा या नैसर्गिक बाजारपेठीय न्यायाने उत्पादन आणि विक्री व्यवस्था उभी राहिली तर बाजारातील पडलेल्या किमतीचा लाभ ग्राहकाला होईल आणि उत्पादन कमी झाले तर बाजार पेठेतील भावाचा फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल हे आम्ही तत्त्वतः मान्य करतो. खुल्या आणि स्पर्धात्मक बाजार पेठेतच कोणत्याही वस्तूंच्या किमतीचे  योग्य संतुलन राखले जाऊ शकते यावर आमचा विश्वास अाहे.  
  • केंद्र सरकारने, देशांतर्गत आणि परदेशांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापारात जागतीक व्यापार संघटनेने निर्धारीत वा मान्य केलेली तत्त्वे अंमलात आणण्यासाठी आग्रह धरावा.  
  • डॉ. स्वामीनाथन अहवालातील निरीक्षणे शेती व्यवसायाचे वास्तव मांडणारी असली तरी त्यांनी सुचवलेल्या उपाययोजना मात्र  शेतकऱ्यांना पुन्हा सरकारच्या मेहरबानीवर अवलंबून ठेवणाऱ्या आणि सरकारचा शेती व्यवसायातील हस्तक्षेप  वाढवणाऱ्या आहेत, त्यामुळे त्या शिफारसी फेटाळाव्यात . 
  • सिंचनाचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करावेत. कोकणात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात आणावे. 
  • गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा.  
  • त्रास देणारे वन्य प्राणी ४८ तासांत न पकडल्यास मारण्याची परवानगी मिळावी.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com