श्रेयवाद, मानापमानात अडकली शेतकरी चळवळ

शेतकऱ्यांना अस्मितेच्या हुंकाराची जाणीव करून देणाऱ्या शरद जोशी यांची आज (ता. ३) जयंती. या महानायकाने उभारलेली चळवळी हळूहळू विखुरली गेली. पण शेतकरी मात्र क्वचितही हलला नाही. त्याचा संघर्ष सुरूच आहे. कर्जमाफीच्या आंदोलनाने हे दाखवून दिले. आता शेतकरी नेते एकत्र येण्याच्या दृष्टीने भानावर कधी येतात, याची तो वाट पाहत आहे.
शेतकरी संघटना
शेतकरी संघटना

शरद जोशींचे सिद्धांत मार्गदर्शकच, पण एकीची बेकी झाल्याचे काय?

सोलापूर : आम्हाला लाचारी, भीक नको, आमचा हक्क हवा, अशी शपथ देणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी एका तत्त्वाने, विचाराने शेतकरी चळवळ बांधली. आजही शरद जोशी यांच्या प्रती जिव्हाळा असणारा आणि छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून फिरणारा कार्यकर्ता चळवळीपासून कधीच वेगळा राहू शकला नाही. पण, दुर्दैवाने आज ही चळवळ श्रेयवाद, गट-तट, मानापमानात अडकल्याने संघटनेसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा सूर उमटत आहे. शेतकऱ्यांना अस्मितेच्या हुंकाराची जाणीव करून देणाऱ्या शरद जोशी यांची आज (ता. ३) जयंती. या महानायकाने उभारलेली चळवळी हळूहळू विखुरली गेली. पण शेतकरी मात्र क्वचितही हलला नाही. आजही तो पाय रोवून उभा आहे. त्याचा संघर्ष सुरूच आहे. कर्जमाफीच्या आंदोलनाने हे दाखवून दिले. आता शेतकरी नेते एकत्र येण्याच्या दृष्टीने भानावर कधी येतात, याची तो वाट पाहत आहे. अलीकडे कर्जमाफीच्या आंदोलनात नेत्यांनी एकी दाखवली. सुकाणू समितीच्या माध्यमातून एक दिशा मिळेल, असं दिसत होतं. पण काही ठराविक नेते आणि संघटना सोडल्या, तर आजही काही नेते, या चळवळीपासून चारहात लांब आहेत. ‘‘कुणी पुढाकार घ्यावा, अडलं कोणाचंच नाही, असं काहीसं झालं आहे, हे धोकादायक आहे. आम्हालाही कळतंय, पण करणार काय, आपण फार छोटे कार्यकर्ते आहोत. हा मात्र प्रामाणिकपणा, निष्ठा आपण कायम शेतकरी संघटनेवर ठेवली आहे, पुढेही ठेवू, फक्त नेत्यांनी एकत्र यायला हवं,’’ असं केमचे (ता. करमाळा, जि. सोलापूर) ज्येष्ठ कार्यकर्ते परमेश्‍वर तळेकर पोटतिडकीने म्हणाले. शेतकरी चळवळीनं मला जगण्याची हिंमत आणि किंमत दिली, हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट (बीड) म्हणाले, की चळवळ म्हटल्यानंतर विविध लोक, त्यांचे वेगवेगळे स्वभाव, स्वतंत्र विचार असणारच. पण थोडा वेळ द्यावा लागेल. शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले (सांगली) यांनी शेतकरी चळवळीत माकप, शेकाप यासारख्या संघटनाही जोडल्या जात असल्याच समाधान व्यक्त केले. परंतु श्रेयवाद, मानापमान टाळून एकत्र येण्याकरिता पुढाकार घेणार कोण, हा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘शेतकरी संघटना संपली, असे म्हणता येणार नाही. संघटनेला आणि शरद जाेशींच्या विचाराला उज्ज्वल भविष्य आहे. शरद जाेशींनी मांडलेेले विचार सरकार आता बाेलू लागले आहेत. हे शरद जाेशी आणि संघटनेचा विजय आहे. सरकारी धाेरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे हा विचार आता शेतकऱ्यांना पटू लागला आहे. सध्या सरकारकडून शेतकऱ्यांची शाेषणाची गती वाढली असून, बळिराजाची माणसे वामनाच्या बाजूला गेल्याने वामनाची सरशी झाली आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.’’ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत म्हणाले, ‘‘शरद जाेशींच्या विचारांनीच विविध शेतकरी संघटना स्थापन झाल्या आहेत हे प्रगल्भ लाेकशाहीच लक्षण असून, प्रत्येक संघटनेच आपापल्या इलाक्यामध्ये प्रभाव असल्याने शेतकरी काेणत्या ना काेणत्या शेतकरी संघटनेशी संलग्न आहे. जेवढ्या संघटना जास्त तेवढे लढा अधिक व्यापक स्वरूपात हाेणार अाहे. शरद जाेशीच म्हणत,‘एका व्यक्तीच्या प्रभावामुळे व्यक्ती आणि संघटनेमध्ये उत्मतता निर्माण हाेते.’ शेतकरी संघटनांच्या विविध नेत्यांनी एकत्र येणं आवश्‍यक आहे, कोणत्याही प्रश्‍नावरील संघर्षासाठी संघटन चळवळ आवश्‍यक असतेच. आमच्यासारख्या नेत्यांनी मानापमान, श्रेयवाद टाळला पाहिजे, तरच हे सगळं घडेल.   - संजय पाटील घाटणेकर,  प्रदेशाध्यक्ष, बळिराजा शेतकरी संघटना शरद जोशी हे आम्हा सगळ्यांचे गुरू, नेते होते. त्यांच्या विचारांवरच आम्ही चालतो. कोणत्याही चळवळीचं नेतृत्व हे विश्‍वासास पात्र असावं लागतं. नेतृत्वाच्या अभ्यासावर, प्रामाणिकपणावर भाळूनच कार्यकर्ते काम करत असतात. आज आमचे नेते तसे काम करत आहेत. पण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सगळ्यांनी एकत्र यायला हवं. तरच प्रश्‍न सुटतील. - रविकांत तुपकर, युवा नेते,  स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com