कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची पूर्णत: दिशाभूल : शरद पवार

सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरकारने शेतकऱ्यांची पूर्णत: दिशाभूल
सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरकारने शेतकऱ्यांची पूर्णत: दिशाभूल

वर्धा : सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरकारने शेतकऱ्यांची पूर्णत: दिशाभूल केली. साडेतीन वर्षांत निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. कर्जमाफीकरिता सहा आदेश काढले. प्रत्येक वेळी दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेली. या फसगतीतून बाहेर पडण्यासाठी जनतेनेच आता भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (ता. १८) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख होते. मंचावर माजी मंत्री वसुधाताई देशमुख, अनिल देशमुख, पक्षाचे वर्धा जिल्हा निरीक्षक आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार वसंतराव कार्लेकर, संदीप बाजोरिया, प्रा. राजू तिमांडे, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, संदीप काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले, की कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळतोय. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांची घोर निराशा या सरकारने केली. लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही. केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर एकट्या विदर्भात ६९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळात झाल्या. करआकारणीच्या कारणावरून मोदींच्या गुजरातमध्ये ५० हजार व्यापारी रस्त्यावर आले. 

राज्यातील कारखानदारी संकटात सापडली असून युवकांच्या हाताला रोजगार नाही. बांधकाम खात्यात २० हजार, तर आयटी व अन्य क्षेत्रांत १५ हजार तरुणांची नोकरी गेली. नोकरी मागणाऱ्यांची संख्या वाढली, त्या प्रमाणात रोजगार उपलब्धी नाही. ११ डिसेंबर रोजी विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राज्यकर्त्यांपर्यंत आपला आवाज पोचविण्याचे त्यांनी सरतेशेवटी आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, तर संचालन लक्ष्मीनारायण सोनवणे यांनी केले. मेळाव्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com