वैद्यकीय क्षेत्राऐवजी ‘ती’ने कृषीला दिली पसंती

शीतल पाटील
शीतल पाटील
जळगाव ः शेती व शेतकरी यांच्यासाठी आपण योगदान द्यावे, त्यांच्या समस्या सोडविण्याच्या कामात आपलाही वाटा असावा या विचारातून शेतकरी कुटुंबातील शीतल पाटील यांनी वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्राऐवजी शेतीचे क्षेत्र निवडले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कृषी अधिकारी (तांत्रिक) या पदावर त्या कार्यरत असून, खते अनुदान, बियाणे व खते मागणी, पुरवठा यासंबंधीचे महत्त्वाचे कामकाज समर्थपणे सांभाळत आहे.  
 
शीतल पाटील यांचे माहेर सांगवी (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील आहे. त्यांचे वडील अर्जुन पाटील हे कृषी उद्योग विकास महामंडळाच्या खते कारखान्यात पाचोरा येथे कार्यरत होते. काम सांभाळून ते घरची शेतीही करायचे. शीतल पाटील या थोरल्या... त्यांना स्वप्नील हे लहान बंधू आहेत. माध्यमिक व १२ वीचे शिक्षण पाचोरा येथेच झाले. १० वी, १२ वी, कृषी विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे.
 
प्राथमिक शिक्षण सुरू होते तेव्हा त्या पेरणीच्या वेळेस शेतात जायच्या. पेरणी पूर्ण होईपर्यंत शेतात थांबायच्या. शेतीबाबतची श्रद्धा, आपुलकी यातूनच वाढली. पुढे शिक्षणामुळे शेतात जाणे कमी झाले. परंतु १२ (विज्ञान)च्या शिक्षणानंतर वैद्यकीय शिक्षणाची संधी होती, परंतु त्यास प्राधान्य न देता त्यांनी कृषी विषयाला महत्त्व दिले. 
 
धुळे कृषी महाविद्यालयात कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. चार वर्षे वसतिगृहात त्या राहिल्या. धुळे ते पाचोरा हे अंतर अधिक असल्याने घरी फारसे येणे होत नव्हते. कृषी पदवीला प्रथम श्रेणी मिळाली. नंतर २००३ मध्ये राहुरी येथील कृषी विद्यापीठात कृषी पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतला. तेथेही प्रथम श्रेणी मिळाली. अभ्यासात चांगली कामगिरी केल्याने ऑगस्ट २००६ मध्ये त्यांना जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरतीअंतर्गत कृषी अधिकारी (तांत्रिक) या पदावर नोकरी मिळाली. सध्या त्या जिल्हा परिषदेत मुख्यालयामध्ये कृषी विभागात कार्यरत असून, खते, बियाणे पुरवठा व मागणी, खते अनुदान याबाबतचे महत्त्वाचे काम सांभाळत आहेत. 
 
जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी, ग्रामीण भागातील मंडळी, शेतकरी यांची कामे अधिक असतात. अनेकदा खतांच्या विषयांवरून दबाव असतो; पण अशा स्थितीत न डगमगता व धडाडीने त्या आपली जबाबदारी पूर्ण करतात. अधूनमधून दौरेही करायचे असतात. वरिष्ठ कार्यालयात सतत अहवाल सादर करायची धावपळ असते. यावल येथील कृषी अधिकारीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. कमीत कमी सुट्या घेणाऱ्या कर्मचारी म्हणून त्यांची विभागात ओळख आहे.
 
त्यांचे पती चेतन चव्हाण (मूळ राहणार निमगूळ, ता. जि. धुळे) हे एका कीडनाशकांच्या कंपनीत कार्यरत असून, शौर्य व अनुष्का ही मुले आहेत. शीतल पाटील सध्या यावल येथे कृषी अधिकारी पदावर कार्यरत असून, जळगावचाही प्रभार त्यांच्याकडे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com