दुष्काळाने शेळ्या-मेंढ्यांची उपासमार

शेळ्या मेंढ्या
शेळ्या मेंढ्या

सांगली : दुष्काळी भागातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने वाडवडिलार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून, चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळाने मेंढपाळ खचत चालला आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.  जत तालुक्‍यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात सुमारे ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या मेंढ्या आहेत. मेंढीपालन हा व्यवसाय आहे. मोकळे रान अधिक असल्याने मेंढपाळांना पावसाळ्यात चाऱ्याची अजिबात कमतरता पडत नसे.  इतर वेळीही चारा उपलब्ध होत असे, मात्र अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत म्हणावा असा पाऊस झाला नाही, त्यामुळे रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालणारा हा व्यवसाय हळूहळू कमी होत आहे.  चारा-पाणी यांचा बिकट प्रश्‍न होत चालल्याने मेंढपाळांचे जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे. गेल्या जूनपासून मोकळ्या रानात चारा उपलब्ध नाही. डोंगरमाथ्यावरील खुरटे गवत सुकून गेले आहे. पाणी नसल्याने झाडेझुडपे सुकून गेली आहेत. झुडपांची पानेसुद्धा वाळून गेली आहेत. झाडाझुडपांवर फक्त वाळलेल्या काटक्‍याच शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे दिवसभर मेंढरं कुठं फिरवून आणायची, असा प्रश्‍न मेंढपाळांपुढे पडला आहे. चारा विकत घेऊन जनावरांना घालायचा आर्थिकदृष्‍ट्या परवडत नाही.  सध्या मेंढ्या विकून प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या कळपातल्या मेंढ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यातच गावात, परिसरात काम नाही. त्यामुळे मेंढ्या विकून आणखी किती दिवस जगायचे असा मोठा प्रश्‍न मेंढपाळांना पडला आहे. मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करतील का, असाही सवाल व्यक्त होत आहे.  शेळ्या-मेंढ्यांची तालुकानिहाय संख्या

तालुका  संख्या
खानापूर ८४,२०३
तासगाव  १,३२,८७७
जत    २,१३,१४२
कवठेमहांकाळ  १,०७,६५९
आटपाडी   ९३९१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com