शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने मोठ्या जनावरांसाठी छावण्यांना परवानगी देऊन त्यांच्या चारापाण्याचा प्रश्न मिटवला असला तरी तालुक्यात बहुसंख्येने असलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मात्र गंभीर झाला आहे. त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची व मेंढपाळांची भटकंती सुरू असून अक्षरशः कडुलिंबाच्या फांद्याही तोडून त्यांची भूक भागवली जात आहे. अशा परिस्थितीत शेळ्या व मेंढ्यांसाठीही चारा व पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वाढू लागली आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जनावरांसाठी चारापाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंतीची वेळ आली आहे. त्यादृष्टीने गाय, बैल, म्हैस अशा मोठ्या जनावरांसाठी प्रशासनाने चारा छावण्यांना परवानगी देऊन त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटवला आहे. 

ग्रामीण भागामध्ये शेळ्या व मेंढ्यांची जास्त संख्या लक्षात घेता त्यांनाही चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. एरवी गवत व चारा उपलब्ध असताना कडुनिंबाच्या कडवट पानांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या शेळ्या मेंढ्या मात्र पोटासाठी सद्यस्थितीत कडुनिंबाची पानेही खाताना दिसत आहेत. शेतातील, बांधावरील, रस्त्याच्या कडेच्या कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्यांना टाकल्या जात आहेत. त्यामुळे नैसर्गिक संतुलनात व औषधी महत्त्व असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर संक्रांत कोसळली आहे. वारंवार फांद्या छाटल्याने ग्रामीण भागात सर्वाधिक संख्येने असलेल्या कडुलिंबाची सावलीही हरवत चालली आहे.

जायकवाडी धरण परिसरात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन तालुक्यासह पाथर्डी तालुक्यातून मेंढपाळांचे कळप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. तेथील पाणी कमी झालेल्या गाळपेर जमिनीवर उगवलेल्या खुरट्या गवतावर त्यांची गुजरान सुरू आहे. मात्र, शेळ्या मेंढ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी ही शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com