शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी ८व्या दिवशी शिरवळ (जि. सातारा) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. माफसूअंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांत हे आंदोलन सुरू असून, अवैधरीत्या दिलेली पदोन्नती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी माहिती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल दराडे यांनी दिली. 

पशुसंवर्धन विभागाने १२५ सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना नियम डावलून पदोन्नती दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. पशुधन विकास अधिकारी नियुक्तीसाठी साडेपाच वर्षांचा बीव्हीएसस्सी अँड एएच हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. या पदवीच्या प्रवेशासाठी बारावीनंतर नीट ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. याउलट पशुधन पर्यवेक्षक मात्र दहावी व नंतर दोन वर्षांची पदविका करूनच पशुधन विकास अधिकारीपदासाठी पात्र ठरतात या प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे, तसेच १९८४ च्या भारतीय पशुवैद्यक कायद्यानुसार पशुधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देता येत नाही, विशेष असे की सद्यःस्थितीत पशुधन विकास अधिकारी गट ब या पदनामामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांना ही मंडळी डॉक्टर आहे असे भासवले जाईल यामुळे शेतकऱ्यांना डॉक्टरऐवजी कंपाउंडरचे मार्गदर्शन डॉक्टर म्हणून मिळणार आहे. 

शासनाच्या या निर्णयामुळे पशुधनाच्या आरोग्याशी खेळ होणार असल्याने हा प्रकार थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. देण्यात आलेली ही पदोन्नती बेकायदेशीर आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही अवैधरीत्या दिलेली पदोन्नती मागे घेण्यात यावी, पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा विविध मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. सोमवारी आंदोलनाचा आठवा दिवस असून, अवैधरीत्या दिलेली पदोन्नती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com