शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे पाऊल

युती
युती

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये चर्चा सुरू झाल्याने भाजपला साथ देणाऱ्या घटक पक्षांचा जीव भांड्यात पडला आहे. सेना-भाजपमधील संवादामुळे पुन्हा एकदा महायुती आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना-भाजपच्या युतीबाबत कमालीची अनिश्चितता होती. युती घडवून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. दोन्ही पक्ष युतीसाठी एकमेकांच्या प्रस्तावाच्या प्रतीक्षेत होते. शिवाय दोन्हीकडून स्वबळाची भाषा सुरू होती. त्यामुळे भाजपचे समर्थन करणाऱ्या छोट्या पक्षांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, गुरुवारी अचानक युतीसाठी चक्रे फिरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला विदर्भ दौरा अर्धवट सोडून थेट ''मातोश्री'' गाठले. फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली. बैठकीतील चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी या भेटीमुळे युतीच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतरही भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. तरीही गेल्या पाच वर्षात दोन्ही पक्षातील कटुता कायम राहिली. मुंबई महापालिकेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात त्वेषाने लढलेल्या शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सेना-भाजपमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे युतीची कोंडी लवकर फुटेल, अशी चिन्हे आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष, रासप, खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी आणि आमदार विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना एकत्र आली होती. महायुती आणि मोदी लाटेमुळे राज्यात काँग्रेस आघाडीचे पानिपत झाले होते. परंतु, गेल्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती बदलली. राजू शेट्टी हे महायुतीतून बाहेर पडले आहेत. तर शिवसेनेने 'मोठा भाऊ' हा अट्टहास कायम ठेवला आहे. त्यामुळे युती झाली तर जागावाटप कसे होईल आणि जागावाटपात आपल्या पदरात काय पडेल? याकडे छोट्या पक्षांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com