शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे संकट गडद

शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे संकट गडद
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे संकट गडद

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आर्थिक घोडेबाजाराने आघाडी व युतीची सर्व समीकरणे मोडीत काढल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना व भाजपमधील संघर्ष या मतदानातून युतीच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचे संकेत आहेत. या दोन्ही मित्र पक्षांतील परस्परविरोधी कुरघोडीच्या खेळीने राज्याच्या राजकारणात नव्या आघाडीचेही संकेत मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या सहा जागांकरिता उद्या (ता. २४) मतमोजणी होत असून, राज्याचे लक्ष याकडे लागले अाहे. भाजप व शिवसेनेने युतीची घोषणा न करता प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, नाशिक व कोकण मतदारसंघात भाजपने थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने युती धर्म मोडीत निघाल्याचे स्पष्ट झाले, तर शिवसेनेने बीड-उस्मानाबाद-लातूर, अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघांत भाजपला धडा शिकवण्याचा विडा उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. नाशिकमध्ये भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने कोकण व नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्‍यता आहे, तर बीड-उस्मानाबाद-लातूर मतदारसंघात कमालीचा चुरशीचा सामना झाला असून, शिवसेनेला अखेरपर्यंत पक्षादेश मिळाला नसल्याने "हाजीर तो वजीर'' अशी मतदारांची अवस्था झाल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघात बीडचा उमेदवार विरुद्ध लातूर-उस्मानाबादचा उमेदवार अशी स्थानिक लढाई झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. परभणीत मात्र कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अमरावती व वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपला संख्याबळाच्या आधारे संधी आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतदारांची भूमिका या दोन्ही मतदारसंघांत निर्णायक ठरेल, असे सांगितले जाते.  राजकीय घडोमोडी

  •  भाजपचा दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा
  •  बीडमध्ये शिवसेना, तर परभणीत भाजप किंगमेकर
  •  विदर्भात शिवसेना-भाजपमध्ये दुरावा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com