संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी शिवसेनेचे ठराव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना अशा अनेक योजनांच्या जाहिराती फक्त झळकतात, पण प्रत्यक्षात योजनांचा फायदा झालेले शेतकरी सापडत नाहीत. त्यामुळे असे जाहिरातबाजीचे सरकार खाली खेचून शिवशाहीचे सरकार आणावे लागेल, अशी हाक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. २३) दिली. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी डॉ. स्वामिनाथन आयोग लागू करावा या मागणीचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

बैठकीत श्री. ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी पुन्हा निवड करण्यात आली. तसेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बैठकीत शिवसेना नेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

या वेळी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार हा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेला ठराव आणि राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि शेतीमालाला उत्पन्नावर आधारित दीडपट हमीभावाची शिफारस करणारा डॉ. स्वामिनाथन आयोग लागू करावा, या मागणीचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

श्री. ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात आज भयंकर स्थिती आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, महिलांची स्थितीही गंभीर आहे. विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. योजना फक्त जाहिरातींमध्ये दिसतात. प्रत्यक्षात कोणाला त्याचा लाभ मिळाला हे दिसत नाही. तेव्हा असे जाहिरातबाजीचे सरकार खाली खेचावेच लागेल आणि शिवशाहीचे सरकार आणावे लागेल. तेव्हा दमलेले असाल तर बाजूला व्हा, दमदार असाल तर सोबत या. मी भगव्याचे राज्य आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. कार्यकारिणीत झालेले ठराव म्हणजे डराव, डराव नाही, औपचारिकता म्हणून झालेले ठराव नाहीत; ते आपल्या सर्वांच्या संमतीने झाले आहेत. मराठी माणसांचे आणि हिंदूंचे स्वप्न मला तुमच्या सोबतीने पूर्ण करायचे आहे.

५६ इंचांच्या छातीत शौर्य हवे श्री. ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ५६ इंचांची छाती महत्त्वाची नाही, तर त्या छातीमध्ये शौर्यही असणे अधिक महत्त्वाचे, असा सणसणीत टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com