कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

शहादा, जि. नंदुरबार ः विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १०) पोलिस ठाण्यासमोर जमलेले शेतकरी.
शहादा, जि. नंदुरबार ः विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १०) पोलिस ठाण्यासमोर जमलेले शेतकरी.

शहादा, जि. नंदुरबार  ः शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शहाद्यात पुकारण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मंगळावारी (ता. १०) मागे घेण्यात आले. 

शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीमालास हमीभाव मिळावा व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता. ९) हिंसक वळण लागले. यात पोलिसांनी भाजीबाजारातील व्यवहार बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याच्या निषेधार्थ मंगळवारी शहादा तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. 

या वेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि माजीमंत्री ॲड. पद्माकर वाळवी यांच्यासोबत महसूल, सहकार आणि पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यात आली. तसेच मागण्यांबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिले.

लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करावा, उपविभागीय पोलिस अधिकारी महारू पाटील यांना निलंबित करावे आणि आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मागण्या करण्यात आल्या होत्या. श्री. साताळकर यांनी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांसमोर मागण्यांबाबत निवेदन वाचून खुलासा केला. स्वतः प्रांत अधिकाऱ्यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com