‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला आणखी शंभर रुपये

सिध्देश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा
सिध्देश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे गेल्यावर्षीच्या (२०१६-२०१७) हंगामात कमी गाळप झाले. तरीही एफआरपीप्रमाणे पूर्ण रक्कम कारखान्याने दिली. गेल्यावर्षी २६०० रुपयांपर्यंतचा दर दिला. त्यात आणखी शंभर रुपयांची वाढ करण्यात येत असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हे शंभर रुपये जमा होतील, अशी माहिती सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी येथे दिली.

कुमठे येथील सिद्धेश्‍वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कारखानास्थळावर झाली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. कारखान्याचे उपाध्यक्ष दीपक आलुरे, संचालक सिद्धाराम चाकोते, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, आण्णाराज काडादी, रमेश बावी, शिवशंकर बिराजदार, गुरुसिद्ध म्हेत्रे, नारायण देवकते, सिद्राम कराळे आदी संचालक या वेळी उपस्थित होते.  
 
श्री. काडादी म्हणाले, की कारखान्याच्या यंदा झालेल्या निवडणुकीत सभासदांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला, या विश्‍वासाला पात्र राहून पुढील पाच वर्षांत दिलेली सगळी आश्‍वासने पाळली जातील. गेल्या दोन वर्षांत कारखान्याच्या हंगामात विविध अडचणी येत आहेत. पण त्यातूनही काटकसरीने, बचतीने मार्ग काढत आहोत.
 
गेल्यावर्षी प्रतिकूल परिस्थितीतही ३ लाख ३९ हजार टन उसाचे गाळप केले. १०.४६ टक्के इतकी रिकव्हरी मिळवली. नोव्हेंबर ते डिसेंबर आणि डिसेंबर ते फेब्रुवारी अशा टप्प्यात आलेल्या उसाला, रिकव्हरीप्रमाणे २७०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना दिला आहे. पूर्वी प्रतिपोते १९५ रुपये इतका ऊस खरेदी कर होता, पण आज तो माफ झाला आहे. तरीही पाच टक्के जीएसटीमुळे भार वाढलेलाच आहे. डिस्टिलरी, इथेनॉल, सहवीज प्रकल्प, कागद कारखाना आणि बायोगॅससारख्या उपपदार्थाच्या उत्पादनात कारखान्याला फारसा नफा झाला नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. पण तरीही त्यातून योग्य तो मार्ग काढू.
 
सभासदांसाठी सुरू असलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजना, शाश्‍वत विकास योजना, लक्षाधीश योजना यासारख्या विविध उपक्रमांतून शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या हंगामात ऊसक्षेत्र चांगले आहे. त्यामुळे गाळप चांगले होईल. यंदाच्या हंगामासाठी एफआरपीप्रमाणे दर देऊ. पण गेल्यावर्षीच्या हंगामासाठी आणखी १०० रुपये देण्यात येतील. त्यानुसार २७०० रुपयांचा अंतिम दर होईल, असेही ते म्हणाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष कुंभार यांनी विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन या वेळी केले.
 
कारखान्याचे अध्यक्ष काडादी यांनी कारखान्याच्या कामगिरीचा आढावा घेताना गेल्या दोन वर्षांतील विविध आर्थिक मुद्दे उपस्थित केले. अगदी कारखान्याच्या गाळपापासून उपपदार्थनिर्मितीचे प्रकल्प तोट्यात असल्याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली. पण यंदाच्या हंगामातील ऊसदराबाबत काहीच आश्‍वासन मिळत नसल्याने सभागृहातील अनेक सभासद बाहेर पडल्याचे दिसले. काही जण बाहेर त्यासंबंधी चर्चा करत माघारी फिरले.

गेल्या आर्थिक वर्षात कारखान्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विभागनिहाय कामगारांचा तसेच लक्षाधीश योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच या वर्षात अपघाती निधन झालेल्या सभासद शेतकऱ्यांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा योजनेतील मदतीचे वाटप करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com