कापूस दरवाढीचे संकेत

महाराष्ट्रासह देशात आता किडका किंवा बोंड अळीग्रस्त कापूस संपला आहे. राज्यात अंदाजित ३५ ते ३८ लाख गाठींचा चांगल्या दर्जाचा कापूस शिल्लक आहे. चीन बांगलादेशकडून सुताची मोठ्या प्रमाणात आयात करीत आहे. बांगलादेशात रुईपासून सूत तयार करण्यासाठी कमी खर्च लागतो. बांगलादेशची रुई इतर देशांना स्वस्त पडत आहे. बांगलादेशच्या सूतगिरण्यांची पूर्ण भिस्त भारतीय कापसावर आहे. एकट्या बांगलादेशात ३५ लाख गाठींची निर्यात भारतातून येत्या काही दिवसांत होईल. - प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन
कापूस दरवाढीचे संकेत
कापूस दरवाढीचे संकेत

जळगाव ः देशांतर्गत बाजारासह चीनकडून सुताची मागणी वाढली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सौदेही चढ्या दरात होऊ लागले असून, न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍स या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारासंबंधीच्या संकेतस्थळावर सोमवारी (ता. ५) मध्यरात्री खंडीचे दर (३५६ किलो रुई) एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढले आहेत. अर्थातच देशातही दरवाढीचे संकेत असून, पुढचे वर्षही कापसासाठी सकारात्मक राहील, असा अंदाज बाजारपेठेतील तज्ज्ञ, अभ्यासकांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला. राज्यात अद्याप ४० टक्के चांगल्या दर्जाचा किंवा पहिल्या तीन चार वेचण्यांचा कापूस शिल्लक आहे. त्यात खानदेशात सुमारे सात लाख गाठींचा, विदर्भात सुमारे १८ लाख गाठींचा, तर मराठवाड्यातही सुमारे १५ लाख गाठींचा कापूस शिल्लक असून, शेतकऱ्यांनी अधिक दरांच्या अपेक्षेने तो साठवून ठेवला. आंतरराष्ट्रीय बाजारात एलडी, ओलम व रेन हार्ट या कंपन्यांचा कापसाबाबतचा हस्तक्षेप वाढला असून, या कंपन्यांच्या माध्यमातून सुतासह कापसाचे सौदे झाले आहेत. अधिक मार्जिनने सौदे मिळविण्यात या कंपन्यांना यश आले असून, कापूस बाजार वधारला आहे. प्रमाणित सुताचे दर तीन दिवसांत किलोमागे पाच रुपयांनी वाढले आहेत. तर टेरी टॉवेल, चादरीनिर्मितीसंबंधी आवश्‍यक सुताचे दर किलोमागे सुमारे साडेतीन रुपयांनी वधारले आहे.  देशात बोंड अळीने खराब झालेल्या कापसापासून तयार झालेले सूत चादरी व टेरी टॉवेलसाठी वापरात येत आहे. तर आता होळीचा उत्सव उत्तरेकडे संपल्याने तेथील कापड मिलांमध्ये पुढील वर्षासाठी गणवेशनिर्मितीसह चादरी आदी निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे. देशात किडका कापूस जवळपास विकला गेला आहे. आता पहिल्या वेचणीच्या कापसापासून दर्जेदार किंवा प्रमाणित रुई तयार होत असून, तिचे दर २०० रुपये किलोपर्यंत पोचले आहेत, तर टेरी टॉवेल कॉटन यार्नला (सूत) १७० रुपये प्रतिकिलो दर आहेत. 

चीनकडून टेरी टॉवेल सुताची खरेदी चीनकडून सध्या दुय्यम दर्जाच्या म्हणजेच चादरी व टेरी टॉवेलसंबंधी आवश्‍यक सुताची खरेदी सुरू आहे. चीनचा आयातीचा धडाका मागील आठ ते १० दिवसांत वाढल्याने सुताचे दर वाढले आहेत. चीनला मागील वर्षी काळा रुई आयात करून त्यापासून सूतनिर्मिती व कापड तयार करून निर्यात करण्यावर भर दिला होता, परंतु मजुरांच्या समस्येसह इतर खर्चात वाढ झाल्याने नजीक असलेल्या भारतीय बाजारातून थेत सुताची खरेदी करून कापड निर्मितीचे नवे धोरण अवलंबले आहे. युरोपमध्ये चीनच्या कापडाचा अधिक खप आहे. त्यासाठी चीनने काही बहुराष्ट्रीय कंपन्यांशी सौद्यांमध्ये अधिकचे मार्जीन देण्याची तयारी दाखवून आपल्याला नजीक असलेल्या भारतीय व बांगलादेशच्या बाजारातून सूत आयातीवर भर दिला आहे, अशी माहिती मिळाली. यामुळे यंदा देशातून सुमारे सात टक्के अधिक सुताची निर्यात होईल. त्यातच रुपया डॉलरच्या तुलनेत डगमगल्याने निर्यातीस चालना मिळत आहे.  कापूस बाजारातील घडामोडी

  • आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वधारला
  • टेरी टॉवेल, चादरीनिर्मितीच्या सूतदरात किलोमागे साडेतीन रुपयांची वाढ
  • चीनकडून आयातीच्या धडाक्याने १० दिवसांत कापूस दर वाढले  
  • चीन सर्वांत मोठा आयातदार देश ठरण्याची शक्यता 
  • बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खरेदीने चढ्या दराने कापसाचे सौदे
  • राज्यातील ४० टक्के शिल्लक कापसाला चांगले दिवस
  • पुढील हंगामही कापसासाठी सकारात्मक राहण्याचे संकेत. 
  • प्रतिक्रिया पुढील वर्षी कापसाचे किमान आधारभूत मूल्यही वाढेल. चीनकडून सुतासह रुईची मागणी आहे. चीन सर्वांत मोठा कापूस आयातदार देश म्हणून पुढे येईल, असे संकेत आहेत. त्यामुळेच की काय सोमवारी न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍समध्ये खंडीचे दर (३५६ किलो रुई) १५०० रुपयांनी वधारले. आमच्या गिरणीतून चीनसह युरोप, तुर्कीमध्ये सुताची निर्यात होत आहे. सूत निर्यात यंदा किमान सात टक्‍क्‍यांनी वाढेल.  - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणी, लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com