नाशिक विभागात गंभीर दुष्काळाची चिन्हे

नाशिक विभागात गंभीर दुष्काळाची चिन्हे
नाशिक विभागात गंभीर दुष्काळाची चिन्हे

नाशिक : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सरकारला नुकत्याच सादर झालेल्या भूजलपातळी अहवालानुसार नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील ४० तालुक्यांपैकी तब्बल ९२.५० टक्के म्हणजेच ३७ तालुक्यांत भूजलपातळी ० ते ३ मीटरपर्यंत घटली आहे. त्यामुळे दुष्काळाचा वणवा अधिक भडकण्याची चिन्हे आहेत.

अवघ्या ७.५० टक्के अर्थात, तीन तालुक्यांतील सरासरी भूजलपातळीत काहीअंशी वाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात प्रथमच भूजलपातळीत घट झाल्याने उत्तर महाराष्ट्राला येत्या काही महिन्यांतच भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यांत सरकारला राज्यातील भूजलपातळीचा अहवाल सादर केला जाततो. हा अहवाल नुकताच सादर झाला असून, त्यानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

या जिल्ह्यांतील १९ तालुक्यांत ० ते १ मीटर, १२ तालुक्यांत १ ते २ मीटर, २ तालुक्यांत २ ते ३ मीटर आणि ४ तालुक्यांत ३ मीटरहून जास्त भूजलपातळी घटली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा अहवाल तांत्रिकदृष्ट्या अद्यापही अपूर्ण असून, या जिल्ह्याचा अहवाल आल्यावर विभागातील भूजलपातळीत घट आढळून आलेल्या तालुक्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

४८१ गावांत भीषण टंचाई भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ऑक्टोबर २०१८ ते जून २०१९ दरम्यानचा टप्प्यानुसार संभाव्य पाणीटंचाई कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विभागातील २६ तालुक्यांतील ४८१ गावांत भीषण पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ८१, धुळे जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील १५८, नंदुरबार जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील ११४, तर जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२८ गावांचा समावेश आहे.

विभागातील भूजलपातळीतील घट / वाढ झालेले जिल्हानिहाय तालुके

जिल्हा   तालुके संख्या   जलपातळीत घट वाढ दर्शविणारे तालुके
नाशिक   १५     निफाड, कळवण, देवळा, त्र्यंबक, नाशिक, इगतपुरी, चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, सुरगाणा, पेठ, दिंडोरी
धुळे   ४   धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर
जळगाव  १५ बोदवड, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा, पारोळा, अमळनेर - मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, भुसावळ, रावेर, यावल
नंदुरबार     ६   नवापूर - शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com