नागपूरला होणार रेशीम कोष मार्केट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता जालना, सोलापूर आणि नागपूर येथे रेशीम कोष बाजारपेठ उभारणी प्रस्तावित असल्याची माहिती रेशीम संचालक भाग्यश्री बानायत-धिवरे यांनी दिली. त्यासाठी जालना, सोलापूर येथे जागा उपलब्ध झाली असून, नागपूरमध्ये जागेचा प्रश्‍न अद्याप मार्गी लागलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या १७ हजार ३०४ शेतकऱ्यांच्या माध्यमातून १८ हजार ९८७ एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषची विक्री ही रामनगर येथील बाजारपेठेत होते. महाराष्ट्रात सध्या रेशीम कोष विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्नाटकात जाऊन कोष विकावे लागतात. त्या ठिकाणी भाषेची अडचण येत असल्याने शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकारही घडतात. त्यावर नियंत्रणासाठी जालना, सोलापूर आणि नागपूर येथे रेशीम बाजारपेठ विकसित करण्याचा रेशीम संचालनालयाचा प्रस्ताव आहे.

जालना येथील रेशीम कोष मार्केटकरिता ६ कोटी १९ लाख ५९ हजार, तर सोलापूरकरिता ६ कोटी ५४ लाख ६४ हजार रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. हा निधी इमारत व इतर सुविधांच्या निर्मितीसाठी औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही करण्यात आला आहे. या बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. जालना येथील प्रस्तावित बाजार एक हेक्‍टरवर, तर सोलापूरचा बाजार १० एकरांवर विस्तारलेला असेल. त्याकरिता जागांचीदेखील उपलब्धता झाल्याची माहिती भाग्यश्री बानायत - धिवरे यांनी दिली.

नागपूरलादेखील कोष मार्केट नागपूर हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांसाठी नागपुरात रेशीम कोष खरेदी मार्केट असावे, असा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, जागेची मागणी करण्यात आली आहे, असेही भाग्यश्री बानायत - धिवरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com