नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे कोरडी

नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे कोरडी

नाशिक : जिल्ह्याला एकीकडे पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांत अवघा १२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास पाणी कपातीचे संकट अटळ आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट असून, आजमितीस अवघा ८ हजार २ दशलक्ष घनफूट इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच जिल्ह्यातील सहा धरणे कोरडी पडलेली आहेत.

२०१६मध्ये नाशिक शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. चेहेडी पंपिंग स्टेशन येथील बंधारा कोरडाठाक पडल्याने तब्बल ६० दिवस पंपिंग स्टेशनला टाळे लावण्याची वेळ आली होती. यंदाही मॉन्सूनचा प्रवास ऐनवेळी रखडल्याने खरिपाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. याशिवाय रोहिणी आणि मृग नक्षत्रांत पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे.

जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील लहान, मोठ्या एकूण २४ धरणांत केवळ १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जोरदार पावसाचे आगमन अजूनही लांबल्यास २०१६ मध्ये कराव्या लागलेल्या पाणीकपातीची नाशिक शहरात पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नागासाक्‍या आणि माणिकपुंज ही सहा धरणे कोरडीठाक पडली आहेत. वाघाड, तिसगाव, गौतमी गोदावरी, पुणेगाव, कडवा, हरणबारी, केळझर आणि गिरणा या आठ धरणांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरण समुहातही अवघा २१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com