कर्जमाफीचे ६ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

कर्जमाफीचे ६ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
कर्जमाफीचे ६ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

कऱ्हाड, जि. सातारा ः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले. महाराष्ट्राचा समतोल विकास साधताना त्यांनी वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. यशवंतरावांच्या विचारांचा वारसा जपताना सामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे हे सरकार असून, राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार कोटी रुपये एवढी कर्जमाफीची रक्कम शासनाने जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कऱ्हाडच्या (जि. सातारा) प्रीतीसंगावरील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी (ता. २५) त्यांच्या समाधीस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले. विकसित महाराष्ट्र, समतोल विकास, शेतकऱ्यांचा, वंचितांचा विकास साधण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले नसले, तरी ते पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याच दिशेने सरकारचे काम सुरू आहे. कालच राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केलेली आहे. शासन वंचिताच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आज स्वर्गीय यशवंतरावांच्या समाधीस्थळावरून याच कार्याची प्रेरणा घेऊन निघालो असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com