सव्वासहा हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रावर आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत गेल्या महिनाभरात शनिवार (ता. १८)पर्यंत ४६९ शेतकऱ्यांच्या ६,३२८.४६ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

आर्द्रतेचे प्रमाण निकषाएवढे येत असल्यामुळे सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. परंतु कळक, दाणे फुटून दाळ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन नाकारले जात असून, परभणी जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीतील खोडा कायम आहे. जिल्ह्यात महिनाभरात केवळ ४२ शेतकऱ्यांचे ४७३.३७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

दरम्यान,नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ५३५ शेतकऱ्यांचा १,८९४.८८ क्विंटल मूग आणि ८७१ शेतकऱ्यांच्या ४,४४१.६८ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे.

खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणण्यापूर्वी पीक पेऱ्याची आॅनलाइन नोंदणी करावी लागत आहे. ही केंद्र सुरू झाली, त्या वेळी मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालामध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रतेचे प्रमाण येत असल्यामुळे खरेदीस खीळ बसली होती. परंतु आता अनेक शेतकरी या खरेदी केंद्रावर विक्रीस आणण्यापूर्वी शेतमाल उन्हात वाळवून आणत आहे. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद खरेदी सुरू झाली आहे. परंतु काढणीच्या वेळी आलेल्या पावसात भिजल्यामुळे दाण्याची प्रत खराब झाली आहे.

दरम्यान लहान आकारचे दाणे (कळक), डाळमिश्रित शेतमाल या खरेदी केंद्रांवर नाकारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने त्याची विक्री करावी लागत आहे.

शनिवारपर्यंत (ता. १८) सोयाबीनची नांदेड जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर २,९३०.०९ क्विंटल, परभणी जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर ४७३.३७ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन खरेदी केंद्रांवर २,९२५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. १,८९४ क्विंटल मुगाची खरेदी

नांदेड जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रांवर ३७.६८ क्विंटल, परभणी जिल्ह्यातील चार केंद्रांवर ३६८ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर १,४८९ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला आहे. ४,४४१ क्विंटल उडदची खरेदी

नांदेड जिल्ह्यातील तीन खरेदी केंद्रावर  १,८३० क्विंटल उडीद, परभणी जिल्ह्यातील दोन केंद्रावर ५.१८ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन केंद्रांवर २,६०६.५० क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात सोयाबीन विक्रीसाठी २,३६० शेतकऱ्यांनी, मुगासाठी ६६९ शेतकऱ्यांनी, उडदसाठी २,३१७ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आता सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण निकषाएवढे येत असल्यामुळे हमीभाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी करून सोयाबीन विक्रीस आणावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी (नांदेड) आर. डी. दांड यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com