कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची वाढ मंदगतीने

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राने केलेल्या अभ्यासात बागायती क्षेत्राच्या तुलनेत कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची वाढ मंदगतीने होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

सेंद्रिय कर्बाबरोबर जमिनीतील नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या नत्राची उपलब्धताही कमी झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे  कृषी विद्यापीठाच्या जॉइंट ॲग्रोस्कोसह हैदराबादच्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलॅण्ड ॲग्रीकल्चर (क्रीडा) संस्थेला संशोधन केंद्राने हा अहवाल सादर केला आहे. विशेष म्हणजे दर वर्षी या अभ्यासाचा फेरआढावा घेण्यात येतो. पण जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होण्याऐवजी ती मंदगतीतच आहे.

सोलापूरसह नगर, सांगली, सातारा, पुणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतीच्या संशोधनासाठी सोलापुरातील संशोधन केंद्र कार्यरत आहे. या अभ्यासाचा एक भाग म्हणूनच संशोधन केंद्र दरवर्षी जमिनीच्या आरोग्याचाही अभ्यास करते.

त्यानुसार संशोधन केंद्राने जमिनीतील सेंद्रिय कर्ब, नत्राची उपलब्धता आणि जमिनीतील उपयोगी जीवाणू यांचा अभ्यास केला. तेव्हा याबाबतचे अनेक धक्कादायक आणि धोकादायक निष्कर्ष हाती आले. त्यात २००२-२००३ मध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.३७ टक्के होते. तेच प्रमाण आता पंधरा वर्षांनी २०१६-२०१७ मध्ये केवळ ०.५० टक्‍क्‍यांवर इतक्‍या मंदगतीने वाढले आहे. तर नत्राचे प्रमाणही पूर्वी १०८ किलो प्रतिहेक्‍टर इतके होते, ते आज ११० किलो प्रतिहेक्‍टरवरच थांबले आहे, ही वाढही असमाधानकारक आहे.

प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण फारच मंद गतीने वाढत आहे, असे दिसून आले आहे. मुख्यतः जमिनीची प्रत हा भाग आहेच, पण त्यापेक्षाही या भागातील जास्त तापमान याला कारणीभूत असल्याचे लक्षात आले. जेथे कोणतीही खते दिली नाहीत, तेथे सेंद्रिय कर्बाच्या वाढीचे प्रमाण अत्यल्प आहे. तर जेथे पूर्णतः सेंद्रिय स्वरुपात खते दिली गेली, तेथे सेंद्रिय कर्बाच्या वाढीचे प्रमाण चांगले आहे. तर पूर्णतः रासायनिक खताचा वापर केलेल्या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मध्यम दिसून आले.

संशोधन केंद्राने रब्बी हंगामातील ज्वारी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांवर त्याचा अभ्यास केला. विशेषतः रब्बी ज्वारीवर त्यात सर्वाधिक भर होता. पण थोड्याफार फरकाने सर्व निष्कर्ष सारखेच राहिले.

सुचविलेले काही उपाय - सेंद्रिय कर्बवाढीसाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत - पेरणीपूर्वी जमिनीत ताग, धैंचा यांसारखी पिके गाडावीत - रासायनिकऐवजी जिवाणू खतांचा वापर वाढवावा - ॲग्रोफॉरेस्टरी अर्थात फळझाडामध्ये आंतरपिके घ्यावीत - आवळा, सीताफळ, बोरात तूर, मूग, उडीद ही पिके घेता येतील

जमिनीतील नत्राचे प्रमाणही कमीच ज्या जमिनीत कोणत्याही प्रकारची खते दिली नाहीत, तसेच पूर्णतः रासायनिक खताचा वापर केला आहे, त्या ठिकाणच्या जमिनीतून उपयोगी जिवाणूंचे प्रमाण अल्प आहे. तसेच नैसर्गिरीत्या जमिनीतून उपलब्ध होणाऱ्या नत्राचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. २००३ मध्ये प्रतिहेक्‍टरी या नत्राचे प्रमाण १३७ किलो होते, ते आता फक्त १४२ किलो आहे. अवघ्या चार टक्‍क्‍याचा फरक त्यात आहे. त्या तुलनेत सेंद्रिय खताच्या वापरात हे प्रमाण समाधानकारक आहे. ते प्रतिहेक्‍टरी १४७ किलोवरून १६० किलोवर आले आहे. जवळपास १३ टक्‍क्‍यांची वाढ आहे.  

अभ्यासासाठी ‘वर्गवारी' रासायनिक व सेंद्रिय खतविरहित, पूर्णतः रासायनिक खताचा वापर आणि पूर्णतः सेंद्रिय खताचा वापर, अशा तीन प्रकारच्या वर्गवारीत हा अभ्यास केला जातो. त्यात पुन्हा त्या-त्या भागातील पिकांची निवड करून पडताळणी केली जाते. संशोधन केंद्रातंर्गत येणाऱ्या दहा जिल्ह्यांतील कोरडवाहू पट्ट्यात याचा सगळा अभ्यास केला जातो, हा अहवाल जॉइंट ॲग्रोस्कोपसारख्या परिषदेतून मांडले जातात. त्याशिवाय हैदराबादच्या क्रीडा संस्थेला दरवर्षी पाठवले जातात.

आम्ही दरवर्षी हा अभ्यास करतो, आमच्या विभागातील जिल्ह्यात त्यासाठी काही ठराविक पिकेही निवडतो. पण हाती आलेल्या निष्कर्षावरून ही काहीशी चिंतेचीच बाब आहे, असे दिसते. शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्बवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच हा प्रश्‍न सुटेल. -डॉ. विजय अमृतसागर, प्रमुख शास्त्रज्ञ तथा सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com