हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले; दिल्लीत मुसळधार

हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले; दिल्लीत मुसळधार
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले; दिल्लीत मुसळधार

नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत झाले, तर मुसळधार पावसासह काही भागात झालेल्या गारांमुळे दिल्लीकरांची मंगळवारी (ता.२२) चांगलीच पळापळ झाली.  काश्‍मीर, हिमाचल प्रदेशमध्येही हिमवृष्टी झाल्याने वातावरण गारठले आहे. हिमाचलमध्ये पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनी हिमवृष्टीचा आनंद घेतला. 

काश्‍मीर खोरे गारठले जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे खोऱ्यातील तापमान नीचांकी पातळीवर पोचले आहे. श्रीनगरला सोमवारी (ता.२१) रात्री उणे ०.२, काझीगुंड येथे उणे ०.८, कोकनर्ग शहरात उणे ०.३ अंश तापमान होते. कुपवाडातही तापमानात घसरण झाली. काश्‍मीरमधील कारगिल हे सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, तेथे उणे ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गुलमर्ग, पहेलगाम येथेही शून्याखालीच तापमान होते.

सिमला, मनालीत पर्यटकांत उत्साह हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला आणि अन्य पर्यटनस्थळी मनाली, कुफ्री, नारकंदा येथे प्रचंड हिमवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी पहाटेच्या वेळी हिमाचलच्या पर्वतरांगात हिमवृष्टी झाली. सिमल्यात सकाळी नऊच्या सुमारास ५ सेंटीमीटरची बर्फवृष्टी झाली. याशिवाय मनाली येथे ५ सेंटीमीटर, कोठी येथे २० सेंटीमीटर, सलोनी येथे ६ सेंटीमीटर, कल्पना येथे ७.४ सेंटीमीटर बर्फवृष्टीची नोंद झाली. हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सिमल्यातील मॉल रोडवर आले होते. तसेच, धर्मशाळा, कांग्रा, पालमपूर, खेरी, बंजर, कसोली, धर्मपूर येथे पावसाची नोंद झाली. आज(बुधवार)ही हिमवृष्टीची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली.  वैष्णोदेवीतील रोप-वे स्थगित खराब हवामान आणि हिमवृष्टीमुळे वैष्णोदेवीला जाण्यासाठीची रोप-वे आणि हेलिकॉप्टरसेवा मंगळवारी (ता. २२) स्थगित करण्यात आली. काश्‍मीरमध्ये त्रिकुटा पर्वतरांगेत वसलेल्या माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात यंदाच्या हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. यामुळे भाविकांसाठीची रोप-वे सेवा आणि हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्यात आली. त्रिकुटा पर्वतरांगेतील भवन, भैरव घाटी, संजीचाहत, हिमकोटी या या मार्गावर हिमवृष्टीची नोंद झाली. हिमवृष्टी होत असतानाही गेल्या चोवीस तासांत १२ हजारांहून भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले.

हिमस्खलनामुळे जवाहर बोगदा बंद श्रीनगर : हिमस्खलनामुळे जवाहर बोगद्यातील दोन्ही मार्गांत अडथळा निर्माण झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी बंद ठेवण्यात आला. हिमस्खलनाचा जोरदार फटका जवाहर बोगद्याला बसला. यामुळे बोगद्याचे काझिगुंडकडील दोन्ही मार्ग बंद झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतून थांबविण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.  दिल्लीत अनेक भागात पाऊस नवी दिल्ली : दिल्लीच्या अनेक भागात मंगळवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी किमान तापमान पाच अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. पाऊस आणि खराब वातावरणामुळे उत्तर रेल्वेच्या सुमारे १५ गाड्या उशिराने धावत होत्या. त्यात हावडा-नवी दिल्ली, माल्दा-दिल्ली जंक्‍शन, फरक्का एक्‍स्प्रेस, मुंबई-अमृतसर यासह अन्य गाड्यांचा यात समावेश आहे. पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्‍स्प्रेस सुमारे ६ तास उशिराने धावत होती. सफदरजंग वेधशाळेत १४.८ मिलीमीटर, पालम वेधशाळेत २२.८ मिलीमीटर, लोधी वेधशाळेत १५ मिलीमीटर, आयानगर येथे २६.१ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com