बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडले

बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडले
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडले

बुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्‍यांतील जमिनीचे आरोग्य धोकादायक वळणावर आले आहे. वेळीच याबाबत जागरूकता दाखवून उपाययोजना झाल्या, तर पीक उत्पादकता टिकवून ठेवणे आवाक्‍यात राहणार आहे; अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या क्षेत्रातील जाणकार देत आहेत.

या जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाला असून, उर्वरित आठ तालुक्‍यांत कमी ते मध्यम या गटात पोचला आहे. सेंद्रिय कर्बाच्या बाबतीत ‘रेड झोन’ असलेल्या तालुक्‍यांमध्ये राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा खामगाव तालुकासुद्धा आहे.

जागतिक बदलांमुळे पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम जाणवायला लागला. त्यानंतर आता सर्वत्र जमिनीच्या आरोग्याविषयी चर्चा सुरू झाली. सध्या बुलडाणा जिल्ह्यात तेराही तालुक्‍यांतील जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. प्रामुख्याने खामगाव, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा या तालुक्‍यांत हा कर्ब अत्यंत कमी आहे. उर्वरित बुलडाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर आणि देऊळगावराजा या तालुक्‍यांत कमी ते मध्यम या प्रकारात आहे. सेंद्रिय कर्ब हा .६० पेक्षा कमी आहे. काही ठिकाणी .२० पासून तो सुरू होतो.

पीक उत्पादनात महत्त्वाची भूमिका वठविणारे नत्र, जस्त, लोह हे घटकही या जमिनीत अत्यंत कमी आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्‍यांत उपलब्ध नत्राचे प्रमाण कमी आहे. मलकापूर, नांदुरा हे दोन तालुके वगळले, तर उर्वरित ११ तालुक्‍यांत जस्ताचेही प्रमाण कमालीचे कमी आढळून आलेले आहे.

लोह हा घटक केवळ लोणार आणि सिंदखेडराजा या तालुक्‍यांमध्ये जास्त आहे. देऊळगावराजा, मेहकर, खामगाव, चिखली या तालुक्‍यांत मध्यम ते जास्त असून बुलडाणा, मोताळा, मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्‍यांमध्ये कमी प्रमाणात आढळतो.

सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात हिरवळीची खतांच्या (ताग, धैंचा) लागवडीसोबतच कंपोस्ट, शेणखत, गांडूळखत वापर वाढविणे गरजेचे आहे. तर नत्र सर्वत्र कमी असल्याने विद्यापीठाने पिकांसाठी जेवढी शिफारस केली त्याच्या २५ टक्के अधिक प्रमाणात वापर वाढविणे पिकाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सूक्ष्म अन्नद्रवे गटात मोडणाऱ्या जस्त, लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक, फेरस सल्फेट याचा वापर करण्याचे सांगितले जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जमीन ही काळी, कसदार आहे.

 जस्ताची कमी असलेले तालुके बुलडाणा, चिखली, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद,  संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा.

सेंद्रिय कर्ब कमी असलेले तालुके खामगाव, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com